Shiv Thakare : 'आपला माणूस' शिव ठाकरे (Shiv Thakare) सध्या भाईजान सलमान खानचा (Salman Khan) 'बिग बॉस' (Bigg Boss 16) गाजवत आहे. 'बिग बॉस 16'चा ग्रॅंड फिनाले जवळ आला असून या पर्वात कोण बाजी मारणार याची चाहत्यांना उत्सुकता आहे. एमसी स्टॅन, प्रियंका चौधरी, शालीन भनोत, अर्चना गौतम आणि शिव ठाकरे या पाच स्पर्धकांचा 'टॉप 5'मध्ये (Top 5) समावेश झाला आहे. पण सध्या सर्वत्र शिव ठाकरेच्या खेळीचं कौतुक होत असून त्याला मराठी कलाकारांपासून राजकारण्यांपर्यंत अनेक मंडळी पाठिंबा देत आहेत.
शिव ठाकरे हा 'बिग बॉस मराठी'च्या दुसऱ्या पर्वाचा विजेता होता. मराठी बिग बॉसप्रमाणे हिंदी 'बिग बॉस'देखील त्याने चांगलच गाजवलं आहे. त्यामुळे चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटी त्याला पाठिंबा देत आहेत. महेश, मांजरेकर, सिद्धार्थ जाधव, मेघा धाडे अशा मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकारांनी शिव ठाकरेसाठी खास पोस्ट शेअर करत त्याला अधिकाधिक वोट करण्यासाठी चाहत्यांना आवाहन केलं आहे.
राज्यातील अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार नवनीत राणा यांनीदेखील एक व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना शिवला वोट करण्याचं आवाहन केलं होतं. आता मनसे नेते अमेय खोपकर यांनीदेखील शिवचं कौतुक केलं आहे. त्यांनी एक पोस्ट शेअर करत शिवला जाहीर पाठिंबा दिला आहे. शिवला शुभेच्छा देत त्यांनी लिहिलं आहे,"आमच्या सर्वांचा अभिमान, महाराष्ट्राची शान शिव ठाकरे 'बिग बॉस हिंदी'च्या ग्रॅंड फिनालेमध्ये पोहोचला आहे. अंतिम फेरीसाठी शुभेच्छा".
बच्चू कडू यांनीदेखील ट्वीट करत शिव ठाकरेला पाठिंबा दिला आहे. त्यांनी लिहिलं आहे,"आपल्या महाराष्ट्राचा एक सामान्य घरातून आलेला तरुण आज बिग बॉसच्या फायनलला पोहचला आहे. आपलं कर्तव्य आहे त्याला एक वोट देऊन विजयाच्या जवळ नेण्याचं. वोट देण्यासाठी voot appचा वापर करा".
'या' दिवशी रंगणार 'बिग बॉस 16'चा ग्रॅंड फिनाले (Bigg Boss 16 Grand Finale)
'बिग बॉस 16' सुरू होऊन आता पाच महिने होत आले आहेत. 100 दिवसांचा हा खेळ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्याने या खेळाचा कालावधी वाढवण्यात आला आहे. पण आता हा खेळ अंतिम टप्प्यात आला असून येत्या 12 फेब्रुवारीला 'बिग बॉस 16'चा ग्रॅंड फिनाले रंगणार आहे. शिव ठाकरे 'बिग बॉस 16'चा विजेता होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे. चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून शिव ठाकरेला पाठिंबा देत आहेत. शिव ठाकरेचा प्रामाणिकपणा आणि त्याची उत्तम खेळी चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे.
संबंधित बातम्या