Manoj Bajpayee on Kangana Ranaut :  सध्या देशात लोकसभा निवडणुकांच (Loksabha Election 2024) बिगुल वाजलं आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकांची तयारी जोरदार सुरु असून अनेक नावंची चर्चा सध्या सुरु आहे. अनेक दिग्गज लोकसभा लढवणार का याची उत्सुकता देशभरात आहे. भाजप (BJP) आणि काँग्रेसकडून (Congress) त्यांच्या उमेदवारांची यादी देखील जाहीर करण्यात आलीये. त्यातच काही कलाकारांच्या नावाची जोरदार चर्चा देखील सुरु आहे. अभिनेत्री कंगना राणौत (Kangana Ranaut) हीचं देखील लोकसभा निवडणुकांसाठी नाव घेतलं जातंय. पण यावर एका बॉलीवूड कलाकाराने प्रतिक्रिया देत स्पष्ट मत व्यक्त केलंय. मनोज वाजपेयीने (Manoj Bajpayee) नुकतच कंगणाविषयी केलेल्या या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरु आहे.


अभिनेता मनोज वाजपेयी याने नुकतच एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये यावर भाष्य केलं आहे. यावेळी मनोज वाजपेयीने कंगणाच्या अभिनयाचं कौतुक केलं पण तिच्या राजकारणावरील चर्चांवर नाराजी देखील व्यक्त केली. कंगना ही एक उत्तम अभिनेत्री आहे पण ती निवडणूक लढवण्याच्या चर्चा एकून मला फार वाईट वाटलं असं स्पष्ट मत मनोज वाजपेयीने यावेळी व्यक्त केलं. 


मला तिच्या त्या चर्चा ऐकून वाईट वाटलं


कंगना एक कमालीची अभिनेत्री आहे. पण नुकतच मी कुठेतरी वाचलं आहे की ती निवडणुकीला उभी राहतेय. ती खूप चांगली अभिनेत्री आहे, यामध्ये शंका नाही. पण अशी अभिनेत्री जेव्हा निवडणुकीला उभी राहतेय, हे जेव्हा मला समजलं तेव्हा फार वाईट वाटलं, असं स्पष्ट मत मनोज वाजपेयीने व्यक्त केलं. 


मनोज वाजपेयीकडून कंगनाचं कौतुक


कंगना राणौत ही एक उत्कृष्ट अभिनेत्री आहे हे मला मान्य आहे. ती एक अप्रतिम अभिनेत्री आहे. जेव्हा मी तिचा  गँगस्टर आणि वो लम्हे हा पहिला चित्रपट पाहिला तेव्हा मी तिच्या अभिनयाचा चाहता झालो. मला तिचं तेव्हा फार कौतुक वाटलं की एवढ्या कमी वयात इतकी अप्रतिम अभिनय कोण कसा करु शकतो? अशा शब्दांत मनोज वाजपेयीने कंगनाच्या अभियनाचं कौतुक केलं आहे. 


कंगना निवडणुकीच्या रिंगणात उतरणार?


अनेक कलाकारांची वर्णी यंदाच्या लोकसभा निवडणुकांमध्ये लागणार असल्याच्या चर्चा आहेत. त्यातच कंगनाचं देखील नावं घेतलं जातं. त्याचप्रमाणे तिच्या सध्याच्या सोशल मीडियाच्या पोस्टवरुन तिला भाजपमधून निवडणूक लढवण्याची संधी मिळणार असल्याचं म्हटलं जात आहे. हिमाचल प्रदेशातील मंडी या लोकसभा मतदारसंघातून कंगनाला लोकसभेचं तिकीट मिळण्याची शक्यता असल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे आता कंगना निवडणुकीच्या रिंगणात उतरणार की नाही हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.