Manobala Passes Away: तमिळ चित्रपटसृष्टीतील अभिनेते आणि दिग्दर्शक मनोबाला (Manobala) यांचे चेन्नई (Chennai) येथे निधन झाले आहे. वयाच्या 69 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी चेन्नईतील साळीग्रामम येथील एल.व्ही.प्रसाद रोड येथील त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात येणार आहे. दिवंगत मनोबाला यांच्या पश्चात पत्नी उषा आणि मुलगा हरीश असे कुटुंब आहे.
मनोबाला यांच्या निधनानं तमिळ चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. अभिनेता-दिग्दर्शक जीएम कुमार आणि रमेश बाला यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन शोक व्यक्त केला आहे.
मनोबाला यांनी 450 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलं
मनोबाला यांनी त्यांच्या कॉमेडी टायमिंगमुळे विशेष ओळख निर्माण केली होती. चित्रपटसृष्टीतील 35 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी 450 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. मनोबाला यांनी 1979 मध्ये भारतीराजाच्या पुथिया वरपुगल या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते.
अभिनेत्री सनम शेट्टीने देखील ट्वीट शेअर केले. या ट्वीटमध्ये तिनं लिहिलं, 'मनोबाला हे ओरिजनल ट्रेंडसेटर, कॉमेडीचे किंग आणि अविस्मरणीय अभिनेता होते. माझ्या पहिल्या कॉमेडी सीनसाठी तुम्ही दिलेल्या टिप्स मला नेहमी आठवतात.'
अभिनेते रजनिकांत यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन शोक व्यक्त केला आहे.
मनोबाला यांनी 1982 मध्ये रिलीज झालेल्या 'अगया गंगाई'चित्रपटामधून दिग्दर्शनात पदार्पण केले. त्यांनी जवळपास 25 चित्रपटांचे दिग्दर्शन केले. त्यांच्या काही लोकप्रिय चित्रपटांमध्ये 'पिल्लई निला', 'ओरकावलन', 'एन पुरुषांथन एनाक्कू मट्टुमथन', 'करुप्पू वेल्लई', 'मल्लू वेट्टी मायनर' आणि 'परंबरियम' या चित्रपटांचा समावेश आहे.
मनोबाला यांनी काही मालिकांमध्ये देखील काम केले तसेच त्यांनी अनेक टीव्ही शोचे दिग्दर्शनही केले होते. 2022 मध्ये 'कुकू विथ कोमली' मध्ये त्यांनी स्पर्धक म्हणून सहभाग घेतला.
इतर महत्वाच्या बातम्या: