गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर 'घटस्फोट सोहळ्या'ची चर्चा जोरात रंगली आहे. घटस्फोट सोहळ्याच्या व्हायरल झालेल्या फोटोने तर सर्वांच्या भुवया उंचवल्या आहेत. आता हेच पहायचं बाकी राहील होतं, आता हे ही पाहायला मिळाल, पुणे तिथे काय उणे, पाटलांचा नादच खुळा, लोक कशाचे सोहळे करतील सांगता येत नाही अशा कमेंट्सचा पूर आला होता. या रहस्याचा आता उलगडा झाला आहे. चार दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलेला हा सोहळा काही घटस्फोट सोहळा नसून 'मंगलाष्टक रिटर्न' या लवकरच प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटा अंतर्गत असणाऱ्या चित्रीकरणाचा एक भाग आहे.


चित्रीकरणास सुरुवात होऊन अवघे चारच दिवस झाले असून या चित्रपटा अंतर्गत होणाऱ्या या घटस्फोट सोहळ्याने तर हाहाकारच माजवला आहे त्यामुळे प्रेक्षकांमधील चित्रपटाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 'मंगलाष्टक रिटर्न' चित्रपटात अभिनेता प्रसाद ओक, आनंद इंगळे, सक्षम कुलकर्णी, वृषभ शहा, अभिनेत्री श्वेता खरात, प्रसन्ना केतकर, शीतल अहिरराव अभिनेता सुनील गोडबोले, कमलेश सावंत, समीर पौलस्ते अभिनेत्री प्राजक्ता नेवळे, सोनल पवार, भक्ती चव्हाण, शीतल ओस्वाल यांच्याही दमदार भूमिका पाहायला मिळणार आहेत.


Exclusive | '..म्हणून थकीत मानधनाची पोस्ट लिहिली' 'हे मन बावरे'च्या कलाकारांनी 'माझा' समोर मांडली क्रोनोलॉजी


लॉकडाउननंतर चित्रपट सृष्टीला मिळालेल्या ग्रीन सिग्नल दरम्यान या 'मंगलाष्टक रिटर्न' चित्रपटाचा शुभारंभ करण्यात आला होता. दिग्दर्शक योगेश भोसले दिग्दर्शित हा चित्रपट असून एका नव्या कोऱ्या विषयाचा आणि कोड्यात टाकणारा दमदार विषय घेऊन हा चित्रपट लवकरच प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. हिंजवडी पुणे येथे या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे. चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानच घटस्फोट सोहळा असे नाव असलेल्या कमानीचा फोटो सर्वत्र व्हायरल झाला आहे. आणि फोटोसह बऱ्याच मनोरंजक अशा कमेंट्सचा माराही पाहायला मिळाला.