अभिनेत्री मृणाल दुसनिस, शर्मिष्ठा राऊत, विदिशा म्हसकर आणि अभिनेता संग्राम समेळ या चौघा कलाकारांनी आपापल्या सोशल मीडियावर थकीत मानधनाबद्दल एक पोस्ट शेअर केली. हे मन बावरे या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या या कलाकारांचा रोख होता तो निर्माता मंदार देवस्थळी यांच्यावर. मराठी इंडस्ट्रीत सहसा कोणी कुणाला असं पब्लिकली बोल लावत नाही. देवस्थळी यांच्यासारख्या अनुभवी बड्या निर्मात्याला तर नाहीच नाही. पण असं काय झालं की या कलाकारांनी असं टोकाचं पाऊल उचललं? यापूर्वी हीच नाराजी त्यांनी देवस्थळी यांच्याकडे बोलून दाखवली होती का? या कलाकारांशी बोलल्यानंतर त्यांनी त्यांची बाजू 'एबीपी माझा'समोर मांडली आहे.


निर्माते मंदार यांच्याकडून या कलाकारांचे येणे आहे ते गेल्या जुलैपासूनचे. जुलै 2020 पासून कलाकार या निर्मात्याकडे पैसे मागत आहेत. केवळ निर्मातेच नव्हे, तर ही मालिका प्रसारित होणाऱ्या कलर्स मराठी वहिनीच्या निदर्शनासही त्यांनी ही बाब आणून दिली. चॅनलने मानधन थकलेल्या सर्वांबाबत सहकार्याची भूमिका घेतली. प्रत्येक एपिसोडचे ठरलेले पैसे चॅनल निर्मात्याला देत असतं. तसे जुलैनंतरचं पेमेंट चॅनलने देवस्थळी यांना केलं. ते करताना कलाकारांना त्याची कल्पना दिली गेली. ही रक्कम लाखो रुपयांच्या घरात होती. चॅनलने पैसे निर्मात्याला दिल्याचं कळल्यावर कलाकारांनी आपलं थकीत मानधन देण्याबद्दल देवस्थळी यांच्याकडे विनंती केली. पण इतके पैसे येऊनही कलाकारांना मानधन दिलं गेलं नाही. लॉकडाऊननंतर एकीकडे चित्रीकरण चालू होतंच. त्यावेळी थकीत मानधन असूनही कलाकारांनी संपूर्ण सहकार्य करत चित्रीकरणात भाग घेतला.


आता 2021 साल उजाडलं होतं. कलाकारांना मानधन मिळालं नव्हतं. पुन्हा हा वाद चॅनल दरबारी गेला. आता मालिकेचे शेवटचे पेमेंट राहीलं होतं. ते क्लिअर करण्यापूर्वी सर्व कलाकारांची आजवरचं पेमेंट क्लिअर असल्याबद्दलची एनओसी चॅनलने निर्मात्याला सक्तीची केली. पण तिथेही मंदार यांच्या आजवरच्या कामाची मेहनतीची दखल घेऊन सर्व कलाकारांनी इ मेलद्वारे एनओसी दिली. अपेक्षा अशी होती की पेमेंटचा शेवटचा हप्ता आल्यावर देवस्थळी थकीत लोकांचं पेमेंट देऊ करतील. एनओसी गेल्यावर चॅनलने निर्मात्याच्या अकाउंटवर पैसे पाठवले. पण त्यानंतरही कलाकारांना जुलैपासूनचं पेमेंट मिळालं नाही. त्यानंतर मात्र अभिनेता शशांक केतकर याची सहनशीलता संपली आणि निर्माते पैसे थकवत असल्याबद्दल त्याने फेसबुकला पोस्ट लिहिली.


दरम्यानच्या काळात अभिनेता शशांक केतकरने मालिकेतल्या सर्व थकीत कलाकारांचा ग्रुप बनवला होता. आपण सर्वांनी एकत्र भूमिका घेण्याबाबत चर्चा झाली होती. शशांकच्या 'त्या' पोस्टनंतर निर्मात्यांनी तातडीने हालचाल करून शशांकचं पेमेंट केलं. त्यानंतर मात्र इतर कलाकारांचा धीर संपला.


गेल्या जुलैपासून कलाकार, तंत्रज्ञ, स्पॉटबॉय, केटरर, स्टुडिओ सर्वांची भाडी थकली असल्याचं कळतं. जर मालिकेसाठी ठरलेले पैसे चॅनल देतं, तेव्हा ते पैसे त्या मालिकेसाठी काम करणाऱ्या लोकांचे असतात. त्यांची देणी देणे अपेक्षित असते. तसं न होता वारंवार सांगून, मेसेज करून पैसे मिळत नसतील तर कलाकारांनी काय करायचं असा यांचा सवाल आहे. आमचंही पोट आहे. हप्ते आहेत. आजारपण असतात त्यासाठी केलेल्या कामाचे पैसे वेळेत मिळाले नाहीत तर काय करायचं? असा प्रश्न हे कलाकार विचारतात.


उठसुठ आम्हीही कुणाबद्दल अशा पोस्ट टाकत नाही. पण आमचीही काहीतरी हतबलता असेल ना? आम्हीही माणूस आहोत. थोडी थोडकी पेमेंट असती तर आम्ही सोडूनही दिलं असतं. शिवाय आत्ता देवस्थळी जे मी माणूस वाईट नाही, परिस्थिती बिकट असल्याचं सांगतात त्याच आशयाचे मेसेज ते अनेक महिने कलाकारांना करतायत. ही परिस्थिती बदलेल असं वाटल्यानेच इतके दिवस वाट पाहिली. पण एकाने पोस्ट टाकल्यावर त्याला पैसे मिळत असतील तर आपण आजवर अशी पोस्ट न करून वेडेपणा केला की काय असं वाटू लागल्याची खंत कलाकार व्यक्त करतात.


माणुसकी आम्हालाही आहे
देवस्थळी यांचं काम मोठं आहे. ते अनुभवी आहेत याची जाण या सर्व कलाकारांना आहे. मंदार देवस्थळी यांनी यापूर्वी एकदा आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं कळल्यानंतर अभिनेता शशांक, शर्मिष्ठा त्यांच्या ऑफिसला गेले होते. त्यांना धीर दिला होता. मृणालचे वडील दवाखान्यात असताना मृणाल चित्रीकरण करत होती. वडिलांच्या निधनानंतर तिसऱ्या दिवशी ती शूटला हजर झाली होती. एक्स्ट्रा शूट असो, बँक शूट असो पेमेंट नसतानाही कोणतीही आडकाठी कलाकारांनी केली नाही ती माणुसकीच होती. आता आपण आपलं काम तर करून बसलो आहे. चॅनलने आपल्या कामाचे पैसे निर्मात्याकडे दिले आहेत. पण निर्माता आठ महिने उलटूनही पैसे देत नाहीय मग कलाकारांनी काय करायचं असा सवाल ही मंडळी विचारतात.