मुंबई : शिवानी रॉय हे नाव आता हिंदी सिनेप्रेमींसाठी नवं नाही. मर्दानीमधून राणी मुखर्जीने शिवानीला रंगवलं होतं. आता हिच शिवानी रॉय पुन्हा एकदा भेटायला आली आहे. राजस्थानच्या कोटामध्ये ती एसपी झाली आहे. तिची नियुक्ती इथं झाल्यानंतर कोटामध्ये एका मुलीचा खून झाला आहे. शिवाय तिला जबर जखमी करून तिच्यावर अमानवी बलात्कारही झाला आहे. त्याचा छडा लावण्यासाठी मर्दानी शिवानी मैदानात उतरते, त्यानंतर हा खूनी आणि ती यांच्यातला थरारक सामना या सिनेमाच्या रूपाने आकाराला येतो.
या सिनेमाची समीक्षा लिहायला घेतल्यानंतर जसं थेट सिनेमाच्या गोष्टीपासून सुरूवात झाली, तसाच हा सिनेमाही आहे. कुठेही फार वेळ न घालवता मर्दानी सुरू होतो. सिनेमात दाखवला जाणारा काळही दसरा ते दिवाळी असाच आहे. याच महिना ते दीड महिन्यात घडणाऱ्या घटना आणि तपासाचं नाट्य यात आहे. सिनेमाचे दिग्दर्शक गोपी पुत्रन हे मूळचे लेखक. त्यांनीच मर्दानीचा पहिला भाग लिहिला होता. आता दुसरा भाग लिहिताना त्यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाचीही जबाबदारी उचलली आहे. लेखनाचं पूर्ण भान असल्यामुळे कथा, पटकथा गोळीबंद कशी असेल याकडे त्यांनी लक्ष दिलं आहे. कथेचा जीव आणि त्याचा विस्तार लक्षात घेता वेळेची मर्यादा लक्षात घेऊन सिनेमाची लांबी न वाढवण्याचा स्तुत्य निर्णय त्यांनी घेतला आहे. अवघ्या 100 मिनिटांचा हा सिनेमा गोळीबंद बनल्यामुळ त्याची पकड कुठेही सुटत नाही. शिवाय, काय आणि किती दाखवायचं याचं भान दिग्दर्शकाला आहे. बलात्कार आणि खून या कथानकाभवती सिनेमा फिरत असल्यामुळे यात बोल्डनेसच्या नावाखाली कितीही आणि काहीही दाखवायला चान्स होता. पण तसं न करता, अत्यंत योग्य पद्धतीने याचं चित्रण करण्यात आलं आहे. म्हणून त्या कृत्याचा राक्षसीपणा प्रेक्षकांपर्यंत पोचतो, त्याच्या वेदनेचा दाहही त्याला जाणवतो पण पाहताना ती फ्रेम बेगडी, अनावश्यक वाटत नाही. याला उत्तम जोड संकलनाने दिली आहे. शिवानी सुर्वै एसपी कशी झाली हे टायटल मोंटाजमधून पेपरच्या कात्रणांमधून कळत जातं. शिवाय सिनेमात सनी या व्यक्तिरेखेचे पैलूही अनेक छोट्या छोट्या संवादांतून त्याच्या वावरण्यातून दिसत राहतं.
नेटकी कथा, उत्तम पटकथा आणि संकलनाला जोड पार्श्वसंगीताची. तांत्रिक बाबींमध्ये हा चित्रपट अव्वल बनला आहे. त्याला जोड आहे ती राणी मुखर्जी आणि विशाल जेठवा या कलाकारांची. राणी मुखर्जी एक उत्तम अभिनेत्री आहेच. आपला तोच रूबाब आणि झपाटलेपण तिने या सिनेमातही जपलं आहे. तिला फारच मोलाची साथ दिली आहे ती विशाल जेठवाने. हा नवखा कलाकार तिच्यासमोर उत्तम उभा आहे. सनीचा माथेफिरूपणा त्याने अफलातून साकारला आहे. आवर्जून उल्लेख करायला हवा तो त्याची मुलींना हेरण्यातली शिताफी, शिवानीसोबतचे प्रसंग केवळ काटा आणणारे. सनीचा वापर या सिनेमात सूत्रधार म्हणूनही करण्यात आला आहे. त्याचा खलनायक तितका चीड आणणारा असल्यामुळे राणी मुखर्जीची शिवानी जास्त हुशार वाटते. अर्थात या सिनेमात काही गोष्टी किंचित खटकणाऱ्याही आहेत. अगदीच उदाहरण द्यायचं तर सनीचं शिवानीच्या घरात घुसणं हे तितकं पटत नाही. असे किरकोळ प्रसंग वगळले तर सिनेमा पुरता खिळवून ठेवतो.
खरंतर पहिल्यांदा सनीचं वागणं न पटणारं वाटतं पण हैदराबाद आणि उन्नावच्या घटना पाहता इतकी जनावरी मनोवृत्ती भवताली असल्याची खात्री पटत जाते. मर्दानी सिनेमाचं नेमक्या या घटना ताज्या असताना येणं हे दुर्दैवी योगायोग म्हणावा लागेल. पण हा सिनेमा जरूर पाहण्यासारखा आहे. पिक्चरबिक्चरमध्ये या सिनेमाला मिळताहेत साडेतीन स्टार्स. हा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन पाहण्यासारखा आहे. केवळ खूनी आणि पोलीसांची तपास यंत्रणा याभोवती सिनेमा फिरत नाही, तर त्याचवेळी राजकारण्यांनी पाळलेले गुंड, आजही पुरुषसत्ताकपद्धतीचा स्त्रियांना बसणारा फटका, पोलीस यंत्रणेतलं राजकारण आदी अनेक गोष्टी प्रकर्षाने पुढे येतात. म्हणून हा सिनेमा महत्वाचा. मर्दानी २ हा न चुकवावा असा सिनेमा आहे.
Mardaani 2 Movie Review : राक्षसी मनोवृत्ती ठेचणारी मर्दानी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
13 Dec 2019 02:47 PM (IST)
सिनेमाचे दिग्दर्शक गोपी पुत्रन हे मूळचे लेखक. त्यांनीच मर्दानीचा पहिला भाग लिहिला होता. आता दुसरा भाग लिहिताना त्यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाचीही जबाबदारी उचलली आहे. लेखनाचं पूर्ण भान असल्यामुळे कथा, पटकथा गोळीबंद कशी असेल याकडे त्यांनी लक्ष दिलं आहे. कथेचा जीव आणि त्याचा विस्तार लक्षात घेता वेळेची मर्यादा लक्षात घेऊन सिनेमाची लांबी न वाढवण्याचा स्तुत्य निर्णय त्यांनी घेतला आहे. अवघ्या 100 मिनिटांचा हा सिनेमा गोळीबंद बनल्यामुळ त्याची पकड कुठेही सुटत नाही.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -