मुंबई : अजय देवगणची मुख्य भूमिका असलेला 'तानाजी - द अनसंग वॉरिअर' या सिनेमाचा ट्रेलर यापूर्वीच आला आहे. त्या ट्रेलरवर लोकांच्या उड्या पडल्या होत्या. आता तोच ट्रेलर मराठी भाषेतून आला आहे. यामध्ये ट्रेलरची सगळी वाक्य मराठीत ऐकू येत असली तरी जी जान या चित्रपटाच्या हिंदी ट्रेलरमध्ये होती ती मराठी ट्रेलरमध्ये नसल्याचं दिसतं. भाषेच्या अनेक त्रुटी या ट्रेलरमध्ये आहेत. शिवाय, ज्या ज्या दृश्यांवरुन, संवादांवरुन वाद उठले होते, त्या वादांना, दृश्यांना या ट्रेलरमधून वगळण्यात आलं आहे.


'तानाजी- द अनसंग वॉरिअर' हा चित्रपट 10 जानेवारी रोजी प्रदर्शित होत आहे. हिंदीसह मराठी आणि इतर भाषांमध्येही तो झळकणार आहे. त्यापैकी मराठी भाषेचा ट्रेलर नुकताच आला आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, ज्या दृश्यांवरुन वाद उठले होते त्या दृश्यांना या ट्रेलरमधून कात्री लावण्यात आली आहे. तर यातल्या संवादांमध्ये बदल करण्यात आले आहेत. हिंदी ट्रेलरमध्ये अभिनेत्री काजोलच्या तोंडी घुंघट आणि जनेवूचा उल्लेख असलेला संवाद होता. आता तिथे अपेक्षेनुसार पदर असा शब्द आला आहे. पण ब्राह्मणोंका जनेवूच्या जागी समद्यांचं घरदार शाबूत राहतंय असा शब्दप्रयोग झाला आहे. शिवाय हिंदी ट्रेलरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांववर हल्ला झाल्याचंही दृश्य होतं. पण ते यातून वगळ्यात आलं आहे. हा झाला दृश्यांचा भाग. शिवाय चित्रपटातल्या भाषेचा लहेजा ग्रामीण करण्याच्या नादात ग्रामीण भाषेची गंमत, लहेजा यांची गोची झाली आहे. करतुया, होतुया आदी क्रियापदांचा वापर यात झालेला दिसतो पण त्यासाठी अपेक्षित शब्दांचा रांगडेपणा यात नाही. ग्रामीण लहेजा उचलताना त्यातल्या अनेक शब्दांमध्ये प्रमाण शब्दांचा उच्चार झाला आहे. क्रियापदांमध्ये आहेच्या जागी हाय.. मीच्या जागी म्या.. अशी भाषा दिसते खरी. पण त्याचवेळी त्याच वाक्यात प्रमाण शब्दही आल्याने शब्दांची मिसळ झाली आहे. त्यामुळे अपेक्षित ठसका यात येत नसल्याची चर्चा नेटिझन्समध्ये आहे.

याबद्दल बोलताना विरारचा प्रथमेश सबनीस म्हणाला, "हिंदी ट्रेलरने अपेक्षा फार वाढवल्या होत्या. त्याचं मराठीकरण करायची काहीच गरज नव्हती. जर करायचं तर नीट भाषा वापरणं आवश्यक होतं. मराठी ट्रेलरने माझा अपेक्षाभंग केला आहे." एका कार्पोरेट कंपनीत काम करणारा संदीप कांबळे यांनीही हीच भावना व्यक्त केली. ते म्हणाले, "वाद होतात म्हणून संवादांमध्ये बदल करायची काहीच गरज नव्हती. दिग्दर्शकाने ते संवाद विचार करुनच सिनेमात घातले असतील. चित्रपटाला जर सेन्सॉरपत्र मिळालं असेल तर निर्मात्यांनी आपल्या चित्रपटावर ठाम राहायला हवं. अन्यथा असे सिनेमेच बनवू नयेत."