Main Atal Hoon : देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांच्या आयुष्यावर आधारित असलेला 'मैं अटल हूँ' (Main Atal Hoon) हा सिनेमा अखेर सिनेमागृहात प्रदर्शित करण्यात आला आहे. या बहुचर्चित सिनेमाची प्रेक्षक गेल्या काही दिवसांपासून प्रतीक्षा करत होते. अशातच आता हा सिनेमा करमुक्त करण्याची मागणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी केली आहे.


विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या पुढाकाराने विधीमंडळात 19 जानेवारी 2024 रोजी 'मैं अटल हूँ' या सिनेमाचं संध्याकाळी 6 वाजता विशेष स्क्रिनिंग करण्यात आलं होतं. यावेळी छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि सिनेमाचे दिग्दर्शक रवी जाधवदेखील (Ravi Jadhav) उपस्थित होते. 


'मैं अटल हूँ' हा सिनेमा भारतरत्न आणि माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर आधारित आहे. सर्वत्र या सिनेमाची चर्चा आहे. हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. अशातच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि दोन्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) अजित पवार (Ajit Pawar) यांना पत्राद्वारे हा सिनेमा करमुक्त करण्याची मागणी केली आहे.


राहुल नार्वेकरांनी लिहिलेल्या पत्रात काय आहे?


राहुल नार्वेकरांनी पत्रात लिहिलं आहे,"भारताचे माजी पंतप्रधान स्व. अटल बिहारी वाजपेयी यांच्या दैदीप्यमान जीवन कार्यावर आधारित हिंदी चित्रपट 'मैं अटल हूँ' 19 जानेवारी 2024 रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या निमित्ताने एक नेतृत्व, एक वकृत्व व महान व्यक्तिमत्त्व रुपेरी पडद्यावर अनुभवण्यास सुवर्णयोग आला. सदरहू चित्रपट हा युवापिढीसह सर्वांसाठीच प्रेरणादायी असून सर्व समाजाकरिता प्रबोधनात्मक व दिशादर्शक आहे, असे मला वाटते. तरी 'मैं अटल हूँ' हा सिनेमा समाजातील सर्व स्तरातील लोकांना रास्त दरात पाहता यावा याकरिता करमुक्त करावा, अशी शिफारस मी आपणास करीत आहे". 


'मैं अटल हूँ' सिनेमाबद्दल जाणून घ्या...


'मैं अटल हूँ' हा सिनेमा 19 जानेवारी 2024 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात अभिनेता पंकज त्रिपाठीने (Pankaj Tripathi) अटल बिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारली आहे. 'द अनटोल्ड वाजपेयी : पॉलिटिशन अॅण्ड पॅराडॉक्स' या पुस्तकावर आधारित हा सिनेमा आहे. या सिनेमातील पंकज त्रिपाठी यांच्या अभिनयाचं कौतुक होत आहे. देश पहले, हिंदू तन मन, हिंदू जीवन, रग रग हिंदू मेरा परिचय ही सिनेमातील गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत.  


संबंधित बातम्या


विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहाच्या सदस्यांसाठी आज 'मैं अटल हूँ'चे विशेष स्क्रीनिंग, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही लाभ