Mahesh Manjrekar : महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) हे मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय लेखक, दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते आहेत. मोठे प्रोजेक्ट केल्यानंतर पुन्हा एकदा ते रंगभूमीकडे वळाले आहेत. 'अरे ला कारे' (Are La Kare) या नाटकाच्या माध्यमातून ते प्रायोजिक रंगभूमीवर दमदार कमबॅक करत आहेत.
प्रायोगिक रंगभूमीवर 'महेश मांजरेकर'
प्रायोगिक रंगभूमीवर येणाऱ्या प्रत्येक नाटकाने रंगभूमीला मनोरंजन सृष्टीला काही ना काही दिलं आहे. एकांकिका स्पर्धा असो वा मग प्रायोगिक रंगभूमी इथून घडणार नवीन तरुण कलाकार यांच्याकडे सातत्याने मनोरंजनसृष्टी लक्ष देऊन असते. लवकरच रंगभूमीवर दाखल होणाऱ्या 'अरे ला कारे' या प्रायोगिक नाटकाने आता मनोरंजन सृष्टीचे लक्ष वेधलं आहे. त्याच कारण ही तसंच खास आहे आणि ते कारण म्हणजे महेश मांजरेकर. मनोरंजन सृष्टीतील महत्वाचा भाग असलेले महेश मांजरेकर हे 'अरे ला कारे' हे नाटक प्रस्तुत करत आहेत. तर या नाटकात प्रमुख भूमिकेत रोहन गुजर हा असून त्याच्या व्यतिरिक्त एक अजून एक मुख्य पात्र या नाटकात आहे. ते पात्र म्हणजे या 'पाडा नंबर 4'.
रोहन गुजर मुख्य भूमिकेत!
'एकांकिका स्पर्धा आणि प्रायोगिक रंगभूमीवर चालणाऱ्या घडामोडीकडे तिथल्या नवीन तरुणाकडे आमचं नेहमीच लक्ष असत त्यांनी आमच्या सोबत येऊन काम करावं ही इच्छा असते, नव्या पिढीकडून काही तरी नवीन घडत असताना या मनोरंजन सृष्टीने पाठीशी उभं राहायला हवं आणि त्यासाठी मी प्रयत्न करतो आहे असं महेश मांजरेकर सांगतात. एकांकिका ते प्रायोगिक असा प्रवास करणार हे नाटक राजरत्न भोजने या तरुण कलाकाराने लिहिलं आणि दिग्दर्शित केलं आहे. आपल्या आजूबाजूला असलेल्या पण दुर्लक्षित घटकाकडे आपल लक्ष वेधून घेणार हे प्रायोगिक नाटक आहे. 'अरे ला कारे' या नाटकाची प्रक्रिया गेल्या वर्ष भरापासून सुरु असून या नाटकाची निर्मिती वरून सुखराज हा तरुण लेखक दिग्दर्शक करत असून आता तो रंगभूमीवर निर्माता म्हणून पदार्पण करतो आहे. या प्रायोगिक नाटकाच्या निमित्ताने मालिका व्यावसायिक नाटक या दोन्ही माध्यमात सध्या चर्चेत असलेला अभिनेता 'रोहन गुजर' या नाटकात प्रमुख भूमिकेत आहे.
भय, गूढता, रोमांच अन् बरंच काही...
'अरे ला कारे' या नाटकाला अनेक व्यावसायिक प्रायोगिक रंगकर्मी हातभार लावत असून या नाटकाला उभं करण्यात संदेश बेंद्रे अमोघ फडके या रंगकर्मींनी खारीचा वाटा उचलला आहे. भय, गूढता, रोमांच असे सगळेच घटक या प्रायोगिक नाटकाच्या निमित्त प्रेक्षकांना पाहता येणार आहे. महेश मांजरेकरांनी दिलेल्या या पाठिंब्या विषयी वरुण सांगतो ' या नाटकाला महेश सरानी दिलेलं हे पाठबळ खरच फार महत्वाचं आणि नाटकासाठी आश्वासक आहे.
प्रायोगिक रंगभूमीवर या नाटकांच्या निमित्ताने आपल्या आजूबाजूला असलेल्या महत्वाच्या घटकाच एक दुर्लक्षित जग आम्ही उभं करतो आहे.' या प्रायोगिक नाटकाचा लेखक दिग्दर्शक राजरत्न भोजने सांगतो 'तात्विक विचार करता जगातल्या विविध घटनांनी आपल्यासमोर नवे प्रश्न निर्माण केले. वातावरणाच्या उलथापालथीत अभिरुचीचे रंग बदलत असताना कला जाणिवा सुद्धा बदलतात अशात या प्रायोगिक नाटकांच्या निमित्ताने आताच्या एका महत्वाच्या घटकाचा विचार आम्ही मांडत आहोत. हा विचार मांडत असता तो विचार संवेदनशील कलाकाराने मांडावा आणि तो कलाकार मला रोहन गुजरच वाटला, त्यात मी संहिता दिल्यानंतर फक्त दीड तासात लगेच आपण करूयात अस सांगण्यासाठी त्याचा फोन, याच सकारत्मक विचाराची मला गरज आहे असं त्यावेळी मला वाटलं. आणि तिथून या नाटकांच्या घडण्याचा प्रवास सुरु झाला. तर या प्रायोगिक नाटकाच्या निमित्ताने रोहन सांगतो.
लग्न आणि लिव्ह इन बद्दल बोलणारं आमने सामने माझं पहिलं व्यावसायिक नाटक. अमेरिका ऑस्ट्रेलिया सिंगापूर कतार असा प्रवास करता करता 300 प्रयोगाचा टप्पा गाठला आहे. तर आईपणाकडे स्वतंत्र आणि वेगवेगळ्या दृष्टिकोनातून बघणाऱ्या दोन तरुणांची गोष्ट हा नवी जन्मेन मी मालिकेचा विषय तर अरे ला कारे हया दीर्घांकात सध्याच्या परिस्थितीवर सध्या नैसर्गिक जाणिवेवर अतिशय मनोरंजकपणे राजरत्न भोजने मांडू पाहतो".
रोहन पुढे म्हणाला,"बऱ्याचदा काही विषयांवर व्यक्त व्हायचं असतं पण फक्त माणूस म्हणून व्यक्त होण्यापेक्षा एखाद्या कलाकृतीच्या माध्यमातून व्यक्त होता आलं तर ते जास्त चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचतं आणि माझ्या ह्या तिन्ही गोष्टींमध्ये मला तेच साध्य करण्याचा प्रयत्न करायचं. तीनही माध्यमांची लोकांपर्यंत पोहोचण्याची ताकद वेगवेगळी आहे. कलाकाराने अभिनयाच्या आणि माध्यमांच्या शक्यता पडताळत राहील पाहिजे आणि मी तेच करणायचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे". या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग येत्या 25 डिसेंबर रोजी यशवंत नाट्यमंदिर येथे होणार आहे.
'अरे ला कारे'बद्दल महेश मांजरेकर म्हणाले...
महेश मांजरेकर 'अरे ला कारे' या नव्या प्रायोगिक नाटकाबद्दल बोलताना म्हणाले,"नव्या संहिता आणि नवीन कलाकार लेखक दिग्दर्शक हे घडायला हवेत. त्यासाठी आपण स्वतः प्रयत्न करणे गरजेचं आहे असं मला वाटत. रंगभूमीवर येणारी प्रत्येक पिढी काही ना काही वेगळं घेऊन येते ती पिढी कशी घडते ती काय कलाकृती घडवते या कडे लक्ष देऊन त्यांचं म्हणणं आपण लक्षात आहे. 'अरे ला कारे' या प्रायोगिक नाटकांच्या निमित्ताने मी माझा प्रयत्न करतो आहे ज्याणेकरून या नवीन तरुण कलाकारांना एक ऊर्जा मिळेल एक आशा निर्माण होईल जेणेकरून त्यांना कळेल की त्यांच्याकडे कोणीतरी लक्ष ठेवून आहे आणि त्यांची पाऊल सकारत्मक दृष्टीने मनोरंजन सृष्टीकडे वळतील".
संबंधित बातम्या