Mahesh Kothare Mother Saroj Kothare Passed Away : अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक महेश कोठारे (Mahesh Kothare) यांच्या आई आणि ज्येष्ठ रंगकर्मी सरोज कोठारे (जेनमा) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. वयाच्या 93 व्या वर्षा त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या कांदिवली येथील निवासस्थानी वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले आहे. 


सरोज कोठारे यांच्या पश्चात मुलगा महेश कोठारे (Mahesh Kothare), नातू आदिनाथ कोठारे (Adinath Kothare) असा परिवार आहे. कांदिवली येथील स्मशानभूमीत रात्री सरोज कोठारे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. जानेवारी महिन्यातच महेश कोठारे यांचे वडील ज्येष्ठ रंगकर्मी अंबर कोठारे यांचे निधन झाले होते. 


सरोज कोठारे यांच्या बद्दल जाणून घ्या... (Who Is Saroj Kothare)


जेनमा कोठारे यांचे मूळ नाव सरोज. माहेरच्या त्या तळपदे. जेनमा यांचे वडील माधवराव तळपदे हे बहुश्रुत व्यक्तिमत्त्व. त्यामुळेच जेनमा यांच्यावर लहानपणापासून चांगले संस्कार झाले. प्रायोगिक रंगभूमीच्या ओढीने जेनमा आणि महेश कोठारे यांचे वडील अंबर कोठारे यांची पहिल्यांदा भेट झाली. 1952 मध्ये ते लग्नबंधनात अडकले.


सरोज यांना 'जेनमा' हे टोपण नाव त्यांना त्यांच्या मावस बहिणीने दिले होते. जेनमा आणि अंबर कोठारे यांनी कालांतराने ‘आर्टिस्ट कंबाइन’ नावाची नाट्यनिर्मिती संस्था स्थापन केली. या संस्थेतर्फे ते विविध नाटके सादर करीत असत. ‘लग्नाची बेडी’, ‘झोपी गेलेला जागा झाला’ या नाटकात जेनमा आणि अंबर कोठारे यांनी एकत्र काम केले होते. 


महेश कोठारे यांच्या चित्रपटसृष्टीतील पदार्पणासाठी तसेच चित्रपटसृष्टीतील त्यांच्या प्रगतीसाठी जेनमा यांनी उत्तरोत्तर विशेष मेहनत घेतली होती. उल्लेखनीय बाब म्हणजे सहा दशकांपूर्वी त्यांनी महेश यांचे शालेय शिक्षण सांभाळून त्यांना चित्रीकरणात सहभागी होऊ दिले होते. महेश कोठारे यांनी बालकलाकार म्हणून ज्या गाजलेल्या हिंदी-मराठी चित्रपटांमध्ये अभिनय केला, त्या चित्रपटांच्या चित्रीकरणादरम्यान जेनमा महेशसोबत सतत असायच्या. 


कालांतराने महेश कोठारे यांनी निर्मिती केलेल्या प्रत्येक चित्रपटामध्ये पडद्यामागे राहून त्यांचा सक्रिय सहभाग असायचा. महेश कोठारे यांनी चित्रनिर्मितीला सुरुवात केली ती ‘धुमधडाका’ चित्रपटापासून. या चित्रपटाची निर्मिती महेश कोठारे यांनी ‘जेनमा फिल्म्स इंटरनॅशनल’ या बॅनरद्वारे केली होती. ‘दे दणादण’, ‘धडाकेबाज’, ‘झपाटलेला’, ‘माझा छकुला’ आदी यशस्वी चित्रपटांची निर्मिती या बॅनरतर्फे करण्यात आली. काही महिन्यांपूर्वीच महेश कोठारे यांचे वडील अंबर कोठारे यांचेदेखील निधन झाले होते.


संबंधित बातम्या


Ambar Kothare Passed Away : महेश कोठारे यांना पितृशोक; ज्येष्ठ रंगकर्मी अंबर कोठारे यांचे वृद्धापकाळाने निधन