Madhuri Dixit : बॉलिवूडची 'धक धक गर्ल' माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) नेहमीच आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकून घेत असते. फक्त 90 च्या दशकातील तरुणाई नव्हे तर आजच्या काळातील लहान मुलांपासून ते वयस्कर मंडळींपर्यंत सर्वांनाच माधुरी आवडते. त्यामुळे माधुरी दीक्षित संबंधित प्रत्येक अपडेट चाहते जाणून घेत असतात. माधुरीचा चाहतावर्ग हा फक्त सर्वसामान्य प्रेक्षकवर्ग नसून बॉलिवूडसह (Bollywood) मराठी मनोरंजनसृष्टीतही तिचा मोठा चाहतावर्ग आहे. आता मराठी मनोरंजनसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते (Vandana Gupte) यांनी माधुरीच्या स्वभावावर भाष्य केलं आहे.


माधुरी दीक्षितचा 'बकेट लिस्ट' (Bucket List) हा सिनेमा 2018 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमात माधुरी दीक्षितसोबत वंदना गुप्ते यांनी काम केलं होतं. 'बकेट लिस्ट'च्या शूटिंगआधी माधुरी खूप छान तयार होऊन आल्याचं वंदना गुप्ते यांनी 'लोकमत फिल्मी'ला (Lokmat Filmy) दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे.


वंदना गुप्तेंनी सांगितला किस्सा (Vandana Gupte Shared Kissa)


'बकेट लिस्ट' या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान वंदना गुप्ते आणि माधुरी दीक्षित यांची चांगली मैत्री झाली होती. 'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत,शूटिंगच्या पहिल्या दिवशी वंदना गुप्ते माधुरीला म्हणाल्या होत्या,"मला तुझ्यासोबत काम करण्याची खूप इच्छा होती. 'बकेट लिस्ट' या सिनेमाच्या माध्यमातून ही इच्छा पूर्ण होत आहे. पण माझी एक अट आहे की,"तू दररोज न चुकता माझ्यासोबत एक सेल्फी काढायचा. त्यानंतर मी विसरले तरी माधुरी मला सेल्फी काढण्याची आठवण करायची. आमचे अनेक सेल्फी मी सोशल मीडियावर शेअर केले आहेत".


माधुरीचा स्वभाव कसा आहे?  (Madhuri Dixit Nature)


माधुरी दीक्षितच्या स्वभावाबद्दल बोलताना वंदना गुप्ते म्हणाल्या,"संसार सांभाळून, मराठी संस्कृती-परंपरा जपून आणि त्यात दोन मुलांचा सांभाळ असं सगळं माधुरी उत्तमप्रकारे करत आहे. खरोखर ती घरंदाज आहे. जगभरात माधुरीची लोकप्रियता आहे. पण तरीही ती अत्यंत साधी सरळ आहे. तिचे पाय आजही जमिनीवर आहेत".


माधुरीची 'बकेट लिस्ट'


माधुरीच्या 'बकेट लिस्ट' या सिनेमात सुमीत राघवन, इला भाटे, प्रदीप वेलणकर, रेणुका शहाणे, कृतिका राव, मिलिंद पाठक, रेशम टिपणीस आणि वंदना गुप्ते हे मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत होते. तगडी स्टारकास्ट असलेला हा सिनेमा चांगलाच गाजला. त्यानंतर माधुरी दीक्षितने 'पंचक' (Panchak) या मराठी सिनेमाची निर्मिती केली. आता माधुरीच्या आगामी मराठी सिनेमांची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.


संबंधित बातम्या


Madhuri Dixit : माधुरी दीक्षितच्या 21 वर्षीय मुलाला पाहून चाहते अवाक्, पर्सनॅलिटीसमोर बॉलिवूडचे सुपरस्टार्सही फेल; पाहा फोटो