Madhur Bhandarkar On Circuitt : "चांदनी बार", "ट्रैफिक सिग्नल", "फॅशन", "पेज ३" , "बबली बाउन्सर", "इंडिया लॉकडाऊन" अशा अनेक पुरस्कारप्राप्त उत्तमोत्तम चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शन केलेले मधुर भांडारकर (Madhur Bhandarkar) आता मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहेत.
आकाश पेंढारकर दिग्दर्शित 'सर्किट' (Circuitt) या मराठी सिनेमाची निर्मिती मधुर भांडारकर यांनी केली आहे. वैभव तत्त्ववादी आणि अभिनेत्री हृता दुर्गुळे ही फ्रेश जोडी या सिनेमात झळकणार आहे. येत्या 7 एप्रिलला हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असून नुकताच या सिनेमाचा उत्कंठावर्धक टीझर सोशल मीडियावर आऊट झाला आहे.
भालजी पेंढारकर यांचा नातू आकाश पेंढारकर हा गेली अनेक वर्षे मराठी मनोरंजन क्षेत्रात कार्यरत आहे. अनेक निर्मिती संस्था आणि चॅनल्समध्ये त्यांनी महत्त्वाच्या पदांवर काम केलं आहे. "कच्चा लिंबू", "होम स्वीट होम", "मस्का", "भेटली तू पुन्हा", "पावनखिंड" अशा अनेक चित्रपटांची प्रस्तुती तर "चोरीचा मामला" या चित्रपटाची निर्मिती आकाश पेंढारकर यांनी केली आहे. त्यापुढे जात आता "सर्किट" या चित्रपटाद्वारे तो आता चित्रपट दिग्दर्शनात पाऊल टाकत आहेत.
वैभव तत्ववादी आणि हृता दुर्गुळे या सिनेमाच्या माध्यमातून पहिल्यांदाच एकत्र काम केले असले तरी या दोघांनीही टीव्ही मालिका आणि चित्रपटांमध्ये उत्तम काम करून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. अभिनेता रमेश परदेशी याचीदेखील या सिनेमात महत्वपूर्ण भूमिका आपल्याला पहायला मिळणार आहे. रोमान्स आणि अॅक्शनचा मिलाफ 'सर्किट' या सिनेमात झाल्याचं टीजरमध्ये पाहता येतं. त्यामुळेच सिनेमाच्या कथेविषयी आणि सिनेमाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. सिनेमाची पटकथा आणि संवाद संजय जामखंडीने लिहिले आहेत.
मधुर भांडारकर म्हणाले,"गेल्या काही वर्षांत मराठी सिनेमाने घेतलेली भरारी मी जवळून पाहिली आहे. मी हिंदी सिनेमात कार्यरत असलो, तरी मराठी सिनेमा आवर्जून पाहतो. त्यामुळेच मराठी सिनेमाची निर्मिती करण्याची इच्छा होती. ती संधी मला 'सर्किट' या सिनेमाद्वारे मिळाली आहे. प्रेक्षकांना हा सिनेमा नक्कीच आवडेल याची मला खात्री आहे".
संबंधित बातम्या