Lokshahi : 'लोकशाही' (Lokshahi) या मराठी सिनेमाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक या धमाकेदार कलाकृतीची आतुरतेने वाट पाहत आहेत. तगडी स्टारकास्ट असलेला हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. घराणेशाहीतला सत्तासंघर्ष टिपणाऱ्या 'लोकशाही'च्या नव्या पोस्टरने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.


घराणेशाहीतला सत्तासंघर्ष टिपणाऱ्या 'लोकशाही'चं पोस्टर लॉन्च  


माणसाची पैशांप्रती भूक भागली की त्याच्या लोभेची धाव सत्तेकडे गतिमान होते आणि अशा सत्तासंघर्षाचा वारसा आपल्या भारत भूमीला थेट प्राचीन महाभारतापासून लाभलेला आहे.  घराणेशाहीतला हा सत्तासंघर्ष नेमका मिळालेला लाभ की शास्वत शाप हा प्रश्न उपस्थित करणारा सुशीलकुमार अग्रवाल निर्मित 'लोकशाही' या सिनेमाच्या पोस्टरवरून प्रकर्षाने जाणवत आहे. 


'लोकशाही' कधी रिलीज होणार? (Lokshahi Movie Release Date)


'लोकशाही'च्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या दृकश्राव्य गतिशिल शीर्षक पोस्टरमधून प्रेक्षकांच्या मनामनात उत्सुकता निर्माण जागी झाली होती.  15 जानेवारी 2024 रोजी मकर संक्रांतीचे औचित्य साधून प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या मुख्य पोस्टरने आता प्रेक्षकांच्या मनात उत्सुकतेबरोबरच विलक्षण प्रश्नांची ठिणगी पेटवली आहे. 






'लोकशाही'च्या पोस्टरमध्ये सुप्रसिद्ध अभिनेते मोहन आगाशे विचारमग्न गंभीर अशा अवस्थेत असून समीर धर्माधिकारी, तेजश्री प्रधान, भार्गवी चिरमुले आणि मराठी सिनेसृष्टीत नावाजलेला अमराठी अभिनेता अंकित मोहन हात जोडून लाखोंच्या संख्येत असणाऱ्या जनतेसमोर काहीतरी आव्हान करत असल्याचे दिसत आहे. नेमके हे आव्हान काय असणार आहे आणि या आव्हानाला जनतेचा काय कौल असणार आहे, हे गुपित प्रेक्षकांच्या उत्सुकतेला ठळक साद घालत आहे.


प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचवणारा 'लोकशाही' 


प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचवणारा 'लोकशाही' सिनेमा संजय अमर यांनी दिग्दर्शित केला असून 9 फेब्रुवारी 2024 रोजी महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. 'लोकशाही' सिनेमाच्या निमित्ताने प्रेक्षकांना चित्रपटगृहात महाभारतातील पात्रे आणि त्यांच्या सत्ता संघर्षासारखाच आजच्या कलियुगातील माणसांच्या राजकारण आणि राजघराण्यातील सत्तासंघर्षाचा विलक्षण अनुभव घेता येणार आहे.


“आपण भारतासारख्या सर्वात मोठ्या लोकशाही देशात राहतो. लोकशाही अस्तित्वात असताना त्याला ठेच पोहचवणाऱ्या राजकारण्यांचं आणि त्यांच्या भ्रष्ट राजकारणाचं वास्तव प्रखरपणे सांगणाऱ्या ‘लोकशाही’ चित्रपटाला नक्कीच तूफान प्रतिसाद मिळेल याची आम्हाला शास्वती आहे.” असे अल्ट्रा मीडियाचे सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले.


संबंधित बातम्या


Shivrayancha Chhava : "रक्तात उकळतो भगवा हा"; 'शिवरायांचा छावा'चं चित्तथरारक पोस्टर आऊट!