हा बघा, मी 1950 मध्येच सेल्फी काढलेला : लता मंगेशकर
एबीपी माझा वेब टीम | 22 Aug 2018 02:10 PM (IST)
ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांनी 65 ते 70 वर्ष जुना फोटो ट्विटरवर शेअर करत आपण त्याकाळी सेल्फी काढल्याचं म्हटलं आहे
मुंबई : गानकोकीळा लता मंगेशकर वयाच्या 88 व्या वर्षीही ट्विटरवर अॅक्टिव्ह आहेत. लतादीदींनी आपला एक फोटो सोमवारी ट्वीट केला. 'सेल्फी ही आजची संकल्पना आहे, मी तो 1950 मध्येच काढला होता' असं मजेशीर कॅप्शन त्यांनी या फोटोला दिलं आहे. जवळपास 65 ते 70 वर्ष जुना फोटो लता मंगेशकर यांनी ट्विटरवर पोस्ट केला आहे. 'नमस्कार. सेल्फ क्लिक्ड - स्वतःच काढलेला स्वतःचा फोटो शेअर करत आहे. 1950 च्या दशकात हा काढला होता. आजकाल त्याला सेल्फी असं म्हटलं जातं' असा मथळा लता मंगेशकरांनी फोटोसोबत लिहिला आहे. ब्लॅक अँड व्हाईट असलेल्या या फोटोमध्ये लता मंगेशकर पुस्तक वाचताना दिसत आहेत. विशेष म्हणजे हा फोटो काढताना आपला हात दिसणार नाही, याची काळजीही लतादीदींनी घेतल्याचं दिसतं. जागतिक छायाचित्रण दिनाच्या निमित्तानेही लता मंगेशकरांनी एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये त्यांच्या हातात डीएसएलआर कॅमेरा आहे.