Lata Mangeshkar Birth Anniversary : गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) नेहमीच पांढऱ्या रंगाची साडी नेसायच्या हे सर्वांनाच माहिती आहे. त्यांनी नेसलेली पांढऱ्या रंगाची साडी कधी प्लेन असते तर कधी वेगळ्या रंगाची बॉर्डर असते. अनेकदा त्या सिल्कच्या साड्या नेसत असे. लता मंगेशकर यांना साड्यांची (Lata Mangeshkar Saree) भयंकर आवड होती. पण पांढऱ्या रंगाची साडी ही लता दिदींची ओळख होती.
लता मंगेशकर म्हटलं की, पांढऱ्या रंगाची साडी नेसलेल्या दिदींचा चेहरा समोर येतो. संगीतासह दिदींचं व्यक्तीमत्त्वदेखील खूप कमाल होतं. लता मंगेशकर यांनी कोणत्या फॅशनचा अवलंब केला नाही. पण त्यांच्या मोहक रुपाने मात्र चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं. पांढऱ्या शुभ्र साडीने लता दिदींचं सौंदर्य खुललं आहे.
लहानपणापासून लता दिदींना आवडतो पांढरा रंग
लता दिदी यांनी एका मुलाखतीत त्यांच्या पांढऱ्या रंगावरील प्रेमाबद्दल भाष्य केलं होतं. त्या म्हणाल्या होत्या,"लहानपणापासूनच मी पांढऱ्या रंगाच्या प्रेमात आहे. लहानपणी परकर पोलकंही मी पांढऱ्या रंगाचंच घालत असे. साडी नेसायला सुरुवात केल्यानंतर मी गुलाबी आणि पांढऱ्या रंगाची साडी नेसत असे. पण दोन्ही रंगापैकी कोणत्या रंगाची साडी नेसायची हे मला कळत नव्हतं. त्यामुळे मी फक्त पांढऱ्या रंगाची साडी नेसण्याचा निर्णय घेतला".
लता दिदींची साडी नेसण्याची पद्धतदेखील एकसारखी होती. लता दिदींना सोन्याच्या दागिन्यांपेक्षा हिऱ्यांच्या दागिण्यांची आवड होती. पण लता दिदींनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की,"पहिल्या कमाईतून मी आईसाठी सोन्याचे दागिने घेतले होते. तर स्वत:साठी हिऱ्याची अंगठी घेतली होती". शेवटपर्यंत लता दिदींकडे ही हिऱ्याची अंगठी होती.
तुम्ही माझ्या साडीवर नव्हे तर कामावर लक्ष द्या; लता दिदी असं का म्हणाल्या?
संगीत दिग्दर्शक जीएम दुर्रानी यांनी साडीच्या रंगावरुन आणि ती नेसण्याच्या पद्धतीवरुन लता दिदींची खिल्ली उडवली होती. रेकॉर्डिंगसाठी स्टुडिओत आलेल्या असताना ते दिदींना म्हणाले होते की,"रंगीबेरंगी साड्या का नेसत नाहीस? फक्त पांढऱ्या रंगाचीच चादर गुंडाळून येतेस?". त्यावर उत्तर देत दिदी म्हणाल्या होत्या,"तुम्ही माझ्या साडीवर नव्हे तर कामावर लक्ष द्या".
लता मंगेशकर यांच्याबद्दल जाणून घ्या...
लता मंगेशकर लोकप्रिय गायिका आणि संगीतकार होत्या. भारतातील लोकप्रिय गायिकांमध्ये त्यांची गणना होते. जवळपास 36 भाषांमध्ये त्यांनी पाच हजारापेक्षा अधिक गाणी गायली आहेत. अनेक मानाच्या पुरस्कारांनी लता दिदींचा सन्मान करण्यात आला आहे.
संबंधित बातम्या