Aamir Khan : बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा (Aamir Khan) ‘लाल सिंह चड्ढा’ (Laal Singh Chaddha) हा आगामी चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी आमिर त्याचे जोरदार प्रमोशन करत आहे. त्याचबरोबर चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान आमिरने खूप मेहनत घेतली आहे. बहुप्रतिक्षित चित्रपट ‘लाल सिंह चड्ढा’ आता रिलीजसाठी सज्ज आहे आणि प्रेक्षक याची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात आमिर खान ‘लाल सिंह चड्ढा’ यांची भूमिका साकारत आहे, जो त्याच्या आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर विविध व्यवसायांमध्ये दिसणार आहे. यापैकी एकामध्ये तो क्रॉस-कंट्री धावपटू देखील आहे.


‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटाच्या शूटिंगसाठी आमिर खानने प्रचंड मेहनत घेतली आहे. या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणाऱ्या आमिर खानला एका सीक्वेन्सच्या शूटिंगदरम्यान जबरदस्त दुखापत झाली होती. आमिर खानने या चित्रपटातील धावण्याच्या सीक्वन्सचे शूटिंग सुरू केले, तेव्हा त्याचा गुडघा दुखावला गेला होता. तरीही, या दुखण्याकडे दुर्लक्ष करत आमिर खानने या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले. यादरम्यान आमिर सतत पेनकिलर औषध घेत होता जेणेकरून त्याला धावण्यामुळे होणाऱ्या त्रासातून तात्पुरता आराम मिळत होता. या दरम्यान त्याची फिजिओथेरपीही झाली.


वेदनेतही पूर्ण केले चित्रीकरण


‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ आमिर खानने आपल्या चित्रपटाच्या शूटिंगमधून एक मिनिटाचाही वेळ वाया घालवला नाही. कोरोनामुळे आधीच चित्रपटाच्या चित्रीकरणाला वेळ झाला होता. शिवाय चित्रपटाच्या रिलीजलाही आधीच विलंब झाला होता आणि त्याला आणखी वेळ वाया घालवायचा नव्हता. यामुळेच वेदना होत असतानाही त्याने या सीक्वेन्सचे शूटिंग पूर्ण केले.


‘या’ दिवशी चित्रपट होणार प्रदर्शित


या चित्रपटातील रनिंग सीक्वेन्समध्ये लाल सिंह चड्ढा वर्षानुवर्षे धावत असल्याचे दाखवण्यात आले आहे. आमिर खान प्रॉडक्शन, किरण राव आणि वायाकॉम 18 स्टुडिओने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटात आमिर खान, करीना कपूर खान, नागा चैतन्य अक्किनेनी आणि मोना सिंग यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या चित्रपटातून नागा चैतन्य बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. ‘लाल सिंह चड्ढा’ हा चित्रपट 11 ऑगस्टला रिलीज होणार आहे.


संबंधित बातम्या


Phir Na Aisi Raat Aayegi Song Out : अरिजित सिंहच्या आवाजाची जादू, 'लाल सिंह चड्ढा' चित्रपटातील बहुप्रतीक्षित गाणे प्रेक्षकांच्या भेटीला!


Laal Singh Chaddha :  ट्रेलर रिलीज होताच आमिरचा 'लाल सिंह चड्ढा' होतोय ट्रोल; लोक करतायत बायकॉटची मागणी