1954 मध्ये म्हणजे पहिलं सुवर्णकमळ श्यामची आई या मराठी चित्रपटाला मिळालं होतं. आचार्य अत्रे दिग्दर्शित आणि निर्मित या चित्रपटाने इतिहास रचला. त्यानंतर दुसरं सुवर्णकमळ मिळवण्यासाठी मराठी चित्रपटाला तब्बल 50 वर्ष वाट पाहावी लागली.
2004 मध्ये संदीप सावंत दिग्दर्शित 'श्वास' चित्रपटाने मराठीतलं दुसरं सुवर्णकमळ मिळवलं. या चित्रपटात अश्विन चितळे, अरुण नलावडे, संदीप कुलकर्णी, अमृता सुभाष या कलाकारांच्या मुख्य भूमिका होत्या.
26 वर्षांच्या कारकीर्दीत अक्षयला पहिल्यांदाच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
कॅन्सरग्रस्त नातू आणि आजोबा यांच्या नातेसंबंधांवर या चित्रपटाची कथा आधारित होती. 'श्वास'मुळे मराठी चित्रपटांना नवसंजीवनी प्राप्त झाल्याचं म्हटलं जातं. यानंतर एका अर्थाने मराठी नव्या युगाची नांदी झाली. विशेष म्हणजे 'ऑस्कर'च्या सर्वोत्कृष्ट परदेशी भाषेतील चित्रपटाच्या नामांकनापर्यंतही श्वासने मजल मारली होती.
2012 मध्ये गिरीश कुलकर्णी अभिनीत, उमेश कुलकर्णी दिग्दर्शित 'देऊळ' या चित्रपटाला सुवर्णकमळ मिळालं. हे मराठी चित्रपटसृष्टीतलं तिसरं सुवर्णकमळ ठरलं. देवस्थानांचं व्यापारीकरण आणि श्रद्धेचा बाजार हा विषय चित्रपटातून मांडला होता.
2015 मध्ये चैतन्य ताम्हाणे दिग्दर्शित 'कोर्ट' चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. हा चित्रपट मराठी, हिंदी, गुजराती आणि इंग्रजी असा बहुभाषिक असला तरी मराठीतलं चौथं सुवर्णकमळ मानलं जातं. 'कोर्ट' या विषयाशी संबंधितांचं व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्य यावर सिनेमातून कटाक्ष टाकला आहे.
2017 चं सुवर्णकमळ सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांनी दिग्दर्शित कासव या चित्रपटाला मिळालं. यंदाचं सुवर्णकमळ हे मराठीतलं पाचवं ठरलं आहे.
National Film Awards : 'कासव'ने पुरस्कारांची शर्यत जिंकली
2017 च्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये 'दशक्रिया' हा मराठीतील सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे. दशक्रिया चित्रपटाला सर्वोत्कृष्ट आधारित पटकथेचाही पुरस्कार मिळाला. मनोज जोशी यांना याच चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक भूमिकेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
राजेश मापुस्कर दिग्दर्शित, अभिनेत्री प्रियंका चोप्राची पहिली मराठी निर्मिती असलेल्या व्हेंटिलेटर या सिनेमाला सर्वोत्कृष्ट संकलन आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग, साऊंड मिक्सिंग या पुरस्कारांनी गौरवण्यात आलं. सायकल चित्रपटाला सर्वोत्कृष्ट वेशभूषेचा पुरस्कार प्राप्त झाला.