मुंबई : इरफान खानची मुख्य भूमिका असलेल्या 'कारवां' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. मृतदेहासोबत प्रवास करणाऱ्या तिघांची मनोरंजक कहाणी या सिनेमात पाहायला मिळणार आहे.

सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारा आहेच, शिवाय कॅन्सरशी लढा देणाऱ्या इरफानला मोठ्या पडद्यावर पाहण्याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

इरफान खानसोबत नवोदित अभिनेता दलकीर सलमान आणि मराठमोळी 'कप साँग'गर्ल मिथिला पालकर या चित्रपटात झळकणार आहेत. कृती खरबंदा, सिद्धार्थ मेनन हे कलाकारही या चित्रपटात दिसतील.

आकर्ष खुराणाचं दिग्दर्शन असलेला 'कारवां' हा चित्रपट 3 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. '3 लॉस्ट सोल्स, 2 डेड बॉडीज अँड अ जर्नी ऑफ अ लाईफटाईम' अशी सिनेमाची टॅगलाईन आहे.

ट्रेलरच्या सुरुवातीलाच दलकीरच्या व्यक्तिरेखेच्या वडिलांचं निधन झाल्याचा फोन कॉल येतो आणि सुरुवात होते एका आगळ्यावेगळ्या प्रवासाला. सिनेमाचा जॉनर गंभीर आहे, असं वाटत असतानाच इरफान त्याच्या वनलायनर्सनी धमाल उडवून देतो.

रॉनी स्क्रूवालांच्या प्रॉडक्शन हाऊसची निर्मिती असलेला 'कारवां'ची बॉक्स ऑफिसवर अनिल कपूर आणि ऐश्वर्या राय-बच्चन यांच्या 'फन्ने खान'सोबत टक्कर होणार आहे. 'कारवां'च्या आदल्या दिवशीच 'फन्ने खान'चाही टीझर रिलीज झाला होता.

इरफान खान सध्या यूएसमध्ये न्यूरोएंड्रोक्राईन ट्युमर या दुर्धर कर्करोगावर उपचार घेत आहे. त्याच्या आजारपणाविषयी समोर आल्यानंतर ब्लॅकमेल हा चित्रपट एप्रिल महिन्यात प्रदर्शित झाला होता. यापूर्वी हिंदी मीडियम, मदारी, जझबामध्ये तो झळकला होता.

पाहा ट्रेलर :