Kartiki Gaikwad : 'सा रे ग म प लिटिल चॅम्प्स' (Sa Re Ga Ma Pa L'il Champs) या झी मराठीवरील (Zee Marathi) सुपरहिट कार्यक्रमाच्या माध्यमातून गायिका कार्तिकी गायकवाड (Kartiki Gaikwad) घराघरांत पोहोचली आहे. कार्तिकीचा मोठा चाहतावर्ग असून काही दिवसांपूर्वीच तिने चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. कार्तिकी गायकवाड 2020 मध्ये पुणेकर असलेल्या रोनित पिसेसोबत (Ronit Pise) लग्नबंधनात अडकली होती. आता लग्नाच्या चार वर्षांनी कार्तिकी आई होणार आहे. कार्तिकीने नुकत्याच एका मुलाखतीत तिला मुलगा हवा की मुलगी तसेच बाळाकडून तिला असणाऱ्या अपेक्षांबद्दल भाष्य केलं आहे. बाळाने संगीतक्षेत्रात यावं अशी इच्छा कार्तिकीने व्यक्त केली आहे.
कार्तिकी गायकवाडचा ओटीभरण कार्यक्रम नुकताच पार पडला. सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट माधुरी खेसे (Madhuri Khese) यांनी ओटीभरण कार्यक्रमात कार्तिकीचा मेकअप केला होता. यादरम्यानचा एक व्लॉग त्यांनी युट्यूबवर शेअर केला आहे. या व्लॉगमध्ये कार्तिकी तिचा आतापर्यंतचा प्रवास, नवी जबाबदारी, बाळाकडून असलेल्या अपेक्षा अशा विविध विषयांवर भाष्य करताना दिसून येत आहे.
कार्तिकी गायकवाडला मुलगा हवा की मुलगी?
माधुरी खेसे यांच्या व्लॉगमध्ये कार्तिकीला तिला मुलगा हवा की मुलगी याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी कार्किकी गायकवाड म्हणाली,"मुलगा हवा की मुलगी याबद्दल मी अजून काहीही विचार केलेला नाही. मुलगा किंवा मुलगी जे कोणी होईल त्या बाळाचं आरोग्य उत्तम असूदेत. बाळाकडून घरातल्यांची, मोठ्यांची आणि देशाची सेवा होऊदेत. तो सुसंस्कृत होवो. आमच्यापरिने आम्ही बाळावर चांगले संस्कार करण्याचा प्रयत्न करू. मुलगा होणार की मुलगी यापेक्षा बाळ जर गाण्याच्या क्षेत्रात आलं तर मला जास्त आनंद होईल. पण बाळाची आवड महत्त्वाची असेल. त्याच्यावर कोणतीही गोष्ट लादणार नाही".
कार्तिकी गायकवाड म्हणाली,"आज माझा ओटीभरणाचा कार्यक्रम आहे. त्यामुळे आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे. बालपणापासून ते अगदी संगीत क्षेत्रातापर्यंत आयुष्यात आतापर्यंत अनेक भूमिका पार पाडल्या आहेत. संगीतक्षेत्रातील माझे गुरू हे बाबा स्वत: असल्याने लहानपणापासूनच गाण्याची आवड आणि त्याच क्षेत्रात वाटचाल झाली आहे. बाबांसोबत कार्यक्रमाला जाण्यापासून ते 'सा रे ग म प लिटिल चॅम्पस'चं पर्व. या कार्यक्रमाच्या माध्यमातून एका लहान कार्तिकी जगभरातील रसिकांपर्यंत पोहोचली आहे. मला तुम्ही उदंड असे आशीर्वाद, प्रेम दिलं".
"माऊलींनी बाळाला सुखी, समाधानी आयुष्य द्यावं" : कार्तिकी गायकवाड
कार्तिकी पुढे म्हणते,"लग्न वगैरे या गोष्टींचा मी कधी विचार केला नव्हता. पण 2020 मध्ये मी रोनित पिसेसोबत लग्नबंधनात अडकले. आता आईच्या भूमिकेची एक वेगळी जबाबदारी असणार आहे. असं म्हणतात की, आई होणं हा स्त्रीचा दुसरा जन्म असतो. आता आईचं महत्त्वं जास्त कळू लागलं आहे. जेव्हा एखादी स्त्री आई होते तेव्हा तिला तिच्या आईचं महत्त्वं जास्त जाणवतं. त्यामुळे ही एक वेगळी भूमिका असणार आहे. आता माऊलींचरणी हेच मागेल की बाळाला सुखी, समाधानी आयुष्य द्यावं, बाळाचं आरोग्य उत्तम राहो. कुटुंबात नवा सदस्य येणार आहे तर त्याच्यावर किंवा तिच्यावर चाहत्यांचे आशीर्वीद राहुदेत".
संबंधित बातम्या