Bollywood Subhash Ghai :  हिंदी सिनेइंडस्ट्री ही बॉलिवूड (Bollywood) म्हणून जगभरात प्रसिद्ध आहे. अमेरिकेत हॉलीवूड शहराच्या नावावरून तेथील सिनेइंडस्ट्रीला हॉलिवूड (Hollywood) असे संबोधण्यात येऊ लागले. त्याच प्रकारे मुंबई (आधीचे बॉम्बे) शहराच्या नावावरून हिंदी चित्रपटसृष्टीला बॉलिवूड असे संबोधण्यात आले, असे म्हणतात. मात्र, निर्माते-दिग्दर्शक सुभाष घई (Subhash Ghai) यांनी बॉलिवूड हे नाव कसे पडले याचा किस्सा सांगितला. भारतीय सिनेइंडस्ट्रीचा अपमान करण्यासाठी हा शब्द वापरण्यात आल्याचा दावा सुभाष घई यांनी केला. 


सुभाष घई यांनी कोमल नहाटा यांना दिलेल्या मुलाखतीत याचा उलगडा केला आहे. सुभाष घई  यांनी आपल्या या मुलाखतीत 1988 ची गोष्ट सांगत बॉलिवूड हा शब्द न वापरण्याची विनंती केली. त्यांनी सांगितले की, बॉलिवूड हा शब्द एखाद्या शिवी प्रमाणे वापरण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. 


सुभाष घई यांनी काय सांगितले?


सुभाष घई यांनी आपल्या मुलाखतीत सांगितले की, 'राम लखन' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यानिमित्ताने आम्ही चायना गार्डनमध्ये एक पार्टी ठेवली होती.त्यावेळी बीबीसीचे एक युनिट आले आणि त्यांनी पूर्वपरवानगी घेऊन प्रीमियर आणि पार्टी कव्हर करायची असल्याचे सांगितले. 


त्यांनी अपमान केला अन्... 


सुभाष घई यांनी पुढे सांगितले की,  त्यांनी प्रीमियर आणि पार्टी कव्हर केली. त्यानंतरच्या दोन आठवड्यांनंतर मी लंडनला गेलो होतो. तेव्हा तिथल्या चॅनेलवर भारतीय चित्रपट निर्माते हॉलीवूडची कशी कॉपी करत आहेत हे दाखवत होते. त्यांनी प्रीमियर, पार्टीत आलेल्या अभिनेत्री, कलाकारांची वेशभूषा, त्यांची पर्स, त्यांची हेअरस्टाइल शूट केली आणि प्रीमियर होत असल्यासारखे शॉट दाखवले. मग त्यांनी हॉलिवूडमध्येही असेच होत आहे आणि बॉलिवूडमध्येही असेच  होत आहे असे दाखवले. याचा अर्थ भारतीय लोक हे नक्कल करणारे आहेत. त्यांच्याकडे काहीच नसल्याचे सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे या इंडस्ट्रीचे नाव बॉलिवूड का ठेऊ नये असा विचार झाला आणि त्यांनी हे बॉलिवूड नाव दिले असल्याचे घई यांनी सांगितले. 






तिरस्काराचा शब्द आपण सन्मान म्हणून स्विकारला...


सुभाष घई यांनी सांगितले की, जो शब्द तिरस्कारातून सुरू करण्यात आला. त्या शब्दाला आपण सन्मान समजलो. त्यामुळे ज्यावेळी बॉलिवूड असा शब्द प्रयोग होतो तेव्हा दु:ख होते. बॉलिवूड हा शब्द वापरून आपण नक्कल करणारे माकड आहोत असे संबोधतो.