Kargil Vijay Diwas : ‘कारगिल युद्ध’ (Kargil War) हे भारताच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाचे युद्ध ठरले. कारगिल युद्धातील भारताच्या विजयाला आज 23 वर्षे पूर्ण होत आहेत. 26 जुलै हा भारताच्या इतिहासातील तो दिवस आहे, जेव्हा 1999मध्ये जवळपास 2 महिने चाललेल्या कारगिल युद्धात भारताने पाकिस्तानला माघार घ्यायला लावली होती. इतकंच नाही, भारतीय सैन्याने जीवाची बाजी लावत अभिमानाने तिरंगा फडकवला होता. या युद्धात पहिल्यांदाच भारतीय सैन्याने 32000 फूट उंचीवर युद्ध केले होते. या युद्धाला ‘ऑपरेशन विजय’ (Operation Vijay) असेही म्हणतात. 26 जुलै 1999 रोजी भारताने हे युद्ध जिंकले. तेव्हापासून हा दिवस दरवर्षी ‘कारगिल विजय दिवस’ (Kargil Vijay Diwas) म्हणून साजरा केला जातो.


कारगिल युद्धाचा हा थरार अनेक बॉलिवूड चित्रपटांमधून प्रेक्षकांना देखील अनुभवायला मिळाला आहे. कारगिल युद्धावर आधारित चित्रपटांमधून प्रेक्षकांनी या युद्धाचा थरार पाहिला. या युद्धात शहीद झालेल्या सैनिकांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटांमधून त्यांची शौर्यगाथा सांगितली गेली. सैन्याच्या या धाडसी कामगिरीवर अनेक चित्रपट तयार केले गेले, ज्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. चला जाणून घेऊया अशाच काही चित्रपटांबद्दल...


एलओसी कारगिल (LOC Kargil)


दिग्दर्शक जेपी दत्ता यांच्या ‘एलओसी कारगिल’ या चित्रपटात या युद्धाची कथा दाखवण्यात आली आहे. या चित्रपटात अभिनेता संजय दत्त, सुनील शेट्टी, सैफ अली खान, अभिषेक बच्चन यांसारख्या अनेक कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. आजची हा चित्रपट प्रेक्षक आवर्जून पाहतात.


लक्ष्य (Lakshya)


बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन अभिनीत ‘लक्ष्य’ हा चित्रपट देखील कारगिल युद्धाच्या कथेवर आधारित होता. ‘लक्ष्य’ हा चित्रपट जरी काल्पनिक असला, तरी याला कारगिल युद्धाची पार्श्वभूमी होती. या चित्रपटात हृतिक रोशन आणि अभिनेत्री प्रीती झिंटा मुख्य भूमिकेत होते. यात एका सैन्यात भरती होणाऱ्या मुलाची कथा सांगितली गेली आहे.


मौसम (Mausam)


2011मध्ये प्रदर्शित झालेला अभिनेता शाहिद कपूरचा ‘मौसम’ हा चित्रपट देखील काहीसा काल्पनिक असला, तरी त्याला कारगिल युद्धाची पार्श्वभूमी होती. यात एका सैनिकाची प्रेमकथा दाखवण्यात आली आहे. त्याचा साखरपुडा होत असतानाच कारगिलमध्ये युद्ध सुरु झाल्याने त्याला सीमेवर परतावे लागते. देशाप्रती आपले कर्तव्य पार पाडणाऱ्या या सैनिकाची कथा प्रेक्षकांना आवडली होती.


धूप (Dhoop)


2003मध्ये प्रदर्शित झालेला ‘धूप’ हा चित्रपट कारगिल युद्धात शहीद झालेल्या एका सैनिकाच्या कुटुंबाच्या कथेवर आधारित होता. अभिनेते ओम पुरी यांनी यात महत्त्वाची भूमिका साकारली होती. एका कुटुंबाचा मुलगा कारगिल युद्धात शहीद होतो आणि त्यानंतर त्याच्या कुटुंबाची होणारी वाताहत या भोवती हा चित्रपट फिरतो.


शेरशाह (Shershaah)


नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आलेला सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांचा ‘शेरशाह’ हा चित्रपट कारगिल युद्धाचे हिरो कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या आयुष्यावर आधारित आहे. या चित्रपटात कॅप्टन बत्रा यांच्या बालपणापासून ते कारगिल युद्धात शहीद झाल्यापर्यंतची कथा दाखवण्यात आली आहे. अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा याने या चित्रपटात कॅप्टन विक्रम बत्रा यांची भूमिका साकारली आहे.


गुंजन सक्सेना : द कारगिल गर्ल (Gunjan Saxena : The Kargil Gir)


अभिनेत्री जान्हवी कपूर अभिनीत ‘गुंजन सक्सेना’ हा चित्रपट शौर्य चक्र विजेत्या पहिल्या महिला लढाऊ पायलट गुंजन सक्सेना यांचा बायोपिक आहे. गुंजन या देशातील पहिल्या महिला फायटर पायलट आहेत, ज्या भारतीय सैन्यासोबत युद्धात उतरल्या होत्या. कारगिल युद्धात त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता.


हेही वाचा :


Kargil Vijay Diwas 2022 : आज कारगिल विजय दिवस; देशासाठी 500 हून अधिक जवानांचे बलिदान, आजही धगधगता इतिहास कायम


Kargil Victory Day : कारगिल विजय दिनाचा उत्साह, ऐतिहासिक दिनाला 23 वर्षे पूर्ण