मुंबई : सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाने अनेक वळणं घेतली आहेत. आता त्याला राजकीय रंगही चढू लागला आहे. त्याचा मृत्यू झाल्यानंतर कंगनासह अनेकांनी बॉलिवू़डमध्ये असलेला नेपोटिझम उजेडात आणला. इथे नातलगांना मिळणारी ट्रीटमेंट आणि आऊटसायडर्सना मिळणारी ट्रीटमेंट चर्चेत आली. यात नावं आली महेश भट्ट, आदित्य चोप्रा आणि करण जोहर यांची. करण आणि सुशांतमध्ये काही वाद झाल्याचंही बोललं जात होतं. अजूनही सुशांतच्या मृत्यूचा वाद शमलेला नाही. अशात त्याचे पडसाद हिंदी इंडस्ट्रीसह ओटीटी प्लॅटफॉर्मवरही उमटू लागले आहेत.


सुशांतच्या मृत्यूप्रकरणी नेपोटिझम चर्चेत आल्यानंतर जी बडी नावं होती त्यात करण जोहरचं नाव होतं. नाव कमावण्यासठी आऊटसायडर्सना अत्यंत हीन ट्रीटमेंट कशी दिली जाते हे सांगतानाच करण जोहरच्या नावाचा उल्लेख झाला. याचा थेट परिणाम नेटफ्लिक्सवर येणाऱ्या 'गुंजन सक्सेना-द कारगिल गर्ल' या सिनेमावर झाला आहे. या सिनेमाचा निर्माता करण जोहर आहे. या सिनेमाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी आला. या ट्रेलर आपण पाहिला असेल तर त्यात कुणाचीच नावं दिसत नाहीत. सर्वसाधारणपणे आघाडीची क्रेडिटस यात येतात. मोठे बॅनर, मोठे कलाकार.. अशी मोठी नावं यात येतात. पण या ट्रेलरमध्ये कुणाचंच नाव दिसत नाही. याचं कारण करण जोहर ठरला आहे.


नेटफ्लिक्स सुशांत सिंह प्रकरणावर लक्ष ठेवून आहे. सध्या जनमानसात सुशांतबद्दल असलेली सहानुभूती त्याच्या 'दिल बेचारा' या सिनेमाला मिळालेल्या हिट्सवरुन दिसली. त्याचवेळी नेपोटिझम आणि सुशांतला योग्य ट्रीटमेंट न देणाऱ्यांबद्दल तरुण वर्गात चीड आहे हे नेटफ्लिक्सने हेरलं आहे. 'गुंजन सक्सेना' हा चित्रपट 12 ऑगस्टला रिलीज करायचं ठरल्यानंतर हा वाद वाढतोय हे लक्षात आल्यानंतर, या चित्रपटाचा निर्माता असलेल्या करण जोहरला सध्या या नामावलीतून डच्चू देण्यात आला आहे.


Viral Check | आदित्य ठाकरे यांच्यासोबत सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती फिरतेय?


त्याच झालं असं, की सुशांतच्या मृत्यूनंतर करण जोहरबद्दल ओढलेला वाद लक्षात घेऊन नेटफ्लिक्सने तूर्त आपल्या 'गुंजन सक्सेना' या चित्रपटाच्या नामावलीतून त्याचं नाव वगळण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सिनेमाची टीम बुचकळ्यात पडली. थेट निर्मात्याचंच नाव वगळणार म्हटल्यावर सगळेच अडचणीत आले. पण केवळ करण जोहरचं नाव वगळलं तर मोठा गहजब उडेल हे लक्षात घेऊन कुणाचीच नावं न टाकण्याचा निर्णय सिनेमाच्या क्रिएटिव्ह टीमने घेतला. म्हणून या ट्रेलरमध्ये कुणाचंच नाव दिसत नाही.


विशेष बाब अशी की गुंजनचं काम केलेल्या जान्हवी कपूरला ब्रेक करण जोहरनेच दिला आहे. त्याच्या 'धडक' सिनेमातून ती पहिल्यांदा दिसली. या 'धडक'चा करण निर्माता होता. त्यानंंतर ती दिसली 'घोस्ट स्टोरीज'मधून. ती फिल्मही करणने दिग्दर्शित केली होती. आता येणाऱ्या 'गुंजन सक्सेना' चित्रपटाचा करण निर्माता आहे. नेपोटिझमचा वाद पाहता करण आणि जान्हवी हे दोघेही अशाच कुटुंबातून येत आहेत. म्हणून या फंदातून तूर्त करण जोहरच्या नावाला डच्चू देण्याचा निर्णय नेटफ्लिक्ससारख्या आंतरराष्ट्रीय ओटीटी प्लॅटफॉर्मने घेतला आहे. याबद्दल अधिकृत वाच्यता मात्र कुठेच होत नाही.


संबंधित बातम्या