Kantara IMDb rating: दिग्दर्शक ऋषभ शेट्टीचा 'कांतारा' (Kantara) चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. 30 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या या अवघ्या चित्रपटाने 14 दिवसांत एकूण बजेट वसूल करत नफा कमावला आहे. बॉक्स ऑफिस रिपोर्टनुसार, 16 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने कन्नड भाषेत 72.81 कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाचे यश पाहून निर्मात्यांनी हा चित्रपट इतर भाषांमध्ये प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. या चित्रपटाचे हिंदी, तमिळ आणि तेलुगू व्हर्जन देखील थिएटरमध्ये रिलीज झाले आहे. तर, IMDbवरही चित्रपटाने चांगले रेटिंग मिळवले आहे.
कन्नड भाषेतील चित्रपट ‘कांतारा’ सध्या सर्वत्र धुमाकूळ घालत आहे. आता हा चित्रपट IMDb वर सर्वोत्तम रेटिंग मिळवणारा भारतीय चित्रपट ठरला आहे. चित्रपटाने IMDb वर 9.5 रेटिंग मिळवून विक्रम रचला आहे. यापूर्वी हा विक्रम ‘KGF 2’च्या नावावर होता.
प्रभास अन् धनुषने केलं कौतुक!
प्रेक्षकांना देखील हा चित्रपट खूप आवडला आहे. अभिनेता प्रभास आणि धनुष यांनीही त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून चित्रपटाची स्तुती केली आहे. प्रभासने सांगितले की, त्याने हा चित्रपट दोनदा पाहिला आहे. त्याने रसिकांना चित्रपटगृहांमध्ये जाऊन हा चित्रपट पाहण्याचे आवाहनही केले आहे. 'कांतारा' (Kantara) हा सध्या IMDb वर सर्वाधिक रेटिंग मिळालेला भारतीय चित्रपट ठरला आहे. केवळ प्रभासच नाही, तर अभिनेता धनुषनेही 'कांतारा' चित्रपट आणि दिग्दर्शक ऋषभ शेट्टीचे कौतुक केले आहे.
याआधी धनुषने एका पोस्टमध्ये लिहिले होते, 'कांतारा... माइंड ब्लोइंग. हा चित्रपट जरूर पहा. ऋषभ शेट्टी, तुला स्वतःचा अभिमान वाटला पाहिजे. होम्बल फिल्म्सचे अभिनंदन. चित्रपटातील सर्व कलाकार आणि तंत्रज्ञांचे अभिनंदन.’
बॉक्स ऑफिसवरही चित्रपटाचा दबदबा!
ऋषभ शेट्टी दिग्दर्शित ‘कांतारा’ हा चित्रपट 30 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. रिलीज होताच या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला. प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटाने जवळपास 90 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाने एकट्या कर्नाटकात 70 कोटींची कमाई केली आहे. आता हा चित्रपट इतर भाषांमध्येही रिलीज करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ‘कांतारा’ हा चित्रपट 14 ऑक्टोबरला हिंदी भाषेत रिलीज झाला आहे. तर, 15 ऑक्टोबरला तमिळ आणि तेलुगू भाषेत रिलीज होणार आहे. KGF नंतर ‘कांतारा’ हा दुसरा कन्नड चित्रपट आहे, ज्याला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे.
हेही वाचा :