मुंबई : तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या आयुष्यावर आधारीत चित्रपट बनवला जात आहे. जयललितांच्या या बायोपिकमध्ये बॉलिवूडची क्वीन कंगना राणावत जयललितांची भूमिका साकारणार आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी याबाबत ट्विटरद्वारे माहिती दिली आहे. आज कंगनाचा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या दिवशी कंगनाने तिच्या चाहत्यांना ही गोड बातमी दिली आहे.


या चित्रपटातील जयललिता यांच्या भूमिकेसाठी सुरुवातीला बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि तेलुगू अभिनेत्री अनुष्का शेट्टी यांच्या नावांची चर्चा सुरु होती. परंतु आता कंगनाच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. तसेच दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक विजय या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असून हा चित्रपट तामिळ भाषेत 'थलाइवी' तर हिंदी भाषेत 'जया' या नावाने प्रदर्शित होणार आहे.

बॉलिवूडमध्ये सध्या बायोपिक्सचा ट्रेण्ड सुरु आहे. 'संजू', 'सुरमा', 'भाग मिल्खा भाग', 'एम. एस. धोनी', 'दंगल', 'मंटो', 'मांझी' ही त्यापैकीच काही उदाहरणं आहेत. राजकीय नेत्यांचे बायोपिक्सही बनवण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने 'ठाकरे', 'दी : अॅक्सीडेंटल प्राईम मिनिस्टर', 'एन. टी. आर. कथानायकुडू', 'पी.एम. नरेंद्र मोदी' या चित्रपटांचा उल्लेख करावा लागेल. आता त्यामध्ये जयललिता यांच्या बायोपिकची भर पडणार आहे.