भारतात कोरोनाची स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार कंबर कसत असतानाच अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींना कोरोनाची लागण झाल्याच्या बातम्या येऊ लागल्या. अनेक कलाकारांना कोरोना झाला. पण तो झाल्यानंतर या कलाकारांनी नेटके उपचार घेऊन कोरोनाला पळवून लावलं. यात कंगना रनौतही अपवाद नव्हती. कंगनाने आपण कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहीती इन्स्टावर दिली. पण तेवढ्यापुरतं ती थांबली नाही. तर कोरोना हा एक फ्लू असल्याचं सांगून टाकलं. 


एकिकडे कोरोनाने अनेकांना आपल्या नातेवाईकांना, मित्र-मैत्रिणीना गमवावं लागलं आहे. असं असताना कंगनाने कोरोनाला केवळ एक फ्लू म्हणून संबोधणं अनेकांना खटकलं. तिच्या या पोस्टवर तशा प्रतिक्रिया आल्या. शिवाय इन्स्टाग्रामनेही ही दखल घेत तिची ती पोस्ट काढून टाकली. कंगनाला इन्स्टाग्रामने केलेली ही ढवळाढवळ फार आवडली नाही. इन्स्टावर येण्यापूर्वी काही दिवस आधीच कंगनाला ट्विटरने सस्पेंड केलं होतं. तब्बल 30 लाख फॉलोअर्स असलेलं अकाऊंट ट्विटरने निलंबित केल्यावर कंगनाची तळपायाची आग मस्तकात गेली. ट्विटरने सस्पेंड केल्यामुळे आपल्याला काहीच फरक पडत नसल्याचं सांगत आपण इतरही सोशल मिडियावरच्या प्लॅटफॉर्मवर येऊ असं सांगत ती इन्स्टावर आली. 


इन्स्टावर येऊन काही दिवस होतात न होतात तोच कंगना कोव्हिड पॉझिटिव आली. त्यानंतर आता आठ दिवस झाल्यानंतर ती निगेटव्ह आली आहे. त्याची माहीती तिने इन्स्टा लाईव्ह वरूनच दिली. पण ती देतानाही तिच्या मनातली खदखद तिने पहिल्या दोन मिनिटांत बोलून दाखवली. व्हिडिओच्या सुरूवातीलाच कंगना आपण निगेटिव्ह आल्याचं सांगते. आणि त्यानंतर मी कोरोनाला फ्लू म्हटल्यामुळे काही लोक नाराज झाल्याचंही तिने नमूद केलं आहे. पण आपल्याकडे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहेच कुठे असं सांगत ती म्हणते, मी खरंतर हे लाईव्ह करणार नव्हते, पण माझी बहीण म्हणाली, की आपला अनुभव आपण सकारात्मक लोकांना सांगायला हवा. आपण कशाला नकारात्मक लोकांच्या मतांचा विचार करायचा.. म्हणून मी आज हे लाईव्ह करते आहे. 


कंगनाने या लाईव्हमध्ये कोरोनाकाळात तिने स्वत:ला कसं सावरल त्याची माहीती दिली आहे. ती म्हणते, मी शारीरीक, मानसिक आणि भावनिक या तीन पातळ्यांवर स्वत:कडे लक्ष दिलं. आणि मग तिने ज्यांना कोरोना होतो त्यांनी कसं स्वत:कडे लक्ष द्यायला हवं याबद्दलही सांगितलं आहे. बाकी सगळ्या गोष्टी तिने अनुभवातून कथन केल्या असल्या तरी या व्हीडिओच्या सुरूवातीला तिने व्यक्त केलेली खदखदच सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरते आहे.