कोविडच्या लाटेशी दोन हात करण्यासाठी अनेक कलााकार पुढे आले आहेत. सलमान खान, अक्षयकुमार, प्रियांका चोप्रा, अनुष्का-विराट, सोनू सूद अशी बरीच मंडळी आहेत. यात आता जॅकलीनही आपल्या फौंडेशनकरवी मदत करू लागली आहे. तिच्या योलो फौंडेशन मार्फत ती सध्या घाटकोपरच्या एका कोविड केअर सेंटरसाठी काम करते आहे. पण त्या पलिकडे जाऊन आपल्या फौंडेशनमार्फत एक महत्वाकांक्षी इच्छा तिने बोलून दाखवली आहे. 


कोविडची मोठी लाट महाराष्ट्रात आल्यानंतर जॅकलीनने कोविडग्रस्तांसाठी हरप्रकारे मदत उभारण्यासाठी कंबर कसली आहे. तिने कोव्हिड वॉरिअर्सना जेवणाची व्यवस्था केली होती. शिवाय, आपल्या योलो फौंडेशनकरवी तिने अनेक कोविडग्रस्तांना बेड्स मिळवून दिले. आता सध्या मनात असलेल्या प्रोजेक्टबद्दल बोलताना एका आघाडीच्या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं, ही लाट मोठी आहे. लोकांना बेड्स आणि ऑक्सिजन मिळत नाहीय. राज्य सरकार प्रयत्न करतं आहेच. पण आपणणही काही गोष्टी करायला हव्यात. यातूनच आता एक नवी कल्पना आम्ही समोर मांडली आहे, त्यातून आमचं फौंडेशन काम करतं आहे. 


या फौंडेशन मार्फत सध्या 100 बेड्सचं रुग्णालय आणि 500 ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर देता येतील का यावर काम चालू आहे. जॅकलीननेच ही माहीती दिली आहे. ती म्हणते, सध्या आम्ही दोन रुग्णवाहिकाही पुरवतो आहोत. जेणेकरून कोविड रुग्णांना तातडीने रुग्णालयात नेता येईल. शिवाय, बेड्सची उभारणी झाली तर त्याचा फायदा कोव्हिडच्या रुग्णांना होऊ शकेल. इतकंच नव्हे, तर या फौंडेशनमार्फत कोविड रुग्णांसाठी हेल्पलाईन तयार करण्याचा विचारही ती करते आहे. कुणालाही कशाही प्रकारची मदत हवी असेल तर ती या हेल्पलाईन करवी करता येणार आहे. ती कशी उभी करता येईल यावर सध्या या फौंडेशनचा अभ्यास चालू आहे.