मुंबई : अभिनेत्री कंगना रणौत (Kangan Ranaut) तिच्या वैयक्तिक आणि प्रोफेशनल लाईफमुळे कायमच प्रसिद्धीझोतात असते. कंगना अनेकदा वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. अभिनेत्री कंगना रणौत लोकसभा निवडणुकीत हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातून निवडून आली आहे. सध्या कंगना तिच्या राजकीय कारकिर्दीवर लक्ष केंद्रित करताना दिसत आहे. अशातच आता कंगना तिचं मुंबईतील घर विकणार असल्याची बातमी समोर येत आहे. कंगना मुंबईच्या वांद्रे येथील बंगला विकणार असल्याचं मीडिया रिपोर्टमध्ये सांगण्यात येत आहे.
कंगना रणौत विकणार मुंबईतील आलिशान बंगला
कंगना राणौत तिचे मुंबईतील घर विकणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, कंगना तिचं मुंबईच्या वांद्रे येथील पाली हिलमधील घर विकणार असल्याचं सांगितलं जात आहे. कंगनाचं प्रॉडक्शन हाऊस मणिकर्णिका फिल्म्सचं ऑफिसही याच बंगल्यामध्ये आहे. या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत कंगना हिमाचल प्रदेशातील मंडी येथून खासदार म्हणून निवडून आली आहे. सध्या राजकारणामुळे कंगना तिचा बहुतांश वेळ दिल्ली आणि हिमाचल प्रदेशमध्ये घालवत आहे, त्यामुळे कंगना तिचे वांद्रेतील घर विकत असल्याचं सांगण्यात येत आहे.
किंमत माहितीय?
मीडिया रिपोर्टनुसार, कंगना रणौत तिचा बंगला 40 कोटींना विकणार असल्याची चर्चा आहे. कोड इस्टेट नावाच्या यूट्यूब चॅनलने एक व्हिडीओ शेअर केल्यावर या चर्चांना उधाण आलं आहे, ज्यामध्ये कंगनाचे घर आणि प्रोडक्शन हाऊसचं कार्यालय विक्रीसाठी असल्याचा दावा करण्यात आला होता.
पालिकेनं चालवला होता बुलडोझर
यूट्यूब चॅनेलने प्रोडक्शन हाऊस आणि मालकाचे नाव उघड केलेले नाही. पण व्हिडिओमध्ये वापरलेली छायाचित्रे आणि दृश्ये हे कंगना रणौतचे ऑफिस असल्याचं सांगतात. हे कंगनाचे घर आणि ऑफिस असल्याचा अंदाज अनेक सोशल मीडिया युजर्सनी कमेंट सेक्शनमध्येही लावला.
कंगना राणौतचा आलिशान बंगला
व्हिडीओवरून हे उघड झाले आहे की, घराचा आकार 285 स्क्वेअर मीटर आहे, ज्याचं बांधकाम क्षेत्र 3042 स्क्वेअर फूट आहे. याशिवाय 500 चौरस फूट अतिरिक्त पार्किंग क्षेत्र आहे. या बंगल्यात दोन मजले असून त्याची किंमत 40 कोटी रुपये आहे. त्यांचे घर विक्रीसाठी आहे की नाही? यावर कंगना राणौतकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. हा तोच बंगला आहे, ज्याची 2020 मध्ये बीएमसीने बुलडोझर चालवला होता.