Kangana Ranaut Annu Kapoor : आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध असलेले ज्येष्ठ अभिनेते अन्नू कपूर (Annu Kapoor) आणि अभिनेत्री नवर्निवाचित खासदार कंगना रणौत (Kangana Ranaut) यांच्यात शाब्दिक चकमक झडली आहे. एका पत्रकार परिषदेत कोण आहे कंगना? असा उलट प्रश्न विचारणाऱ्या अन्नू कपूर यांच्यावर कंगना रणौतने जोरदार पलटवार केला आहे.  


अन्नू कपूर यांची भूमिका असलेला 'हमारे बारह' या चित्रपटाच्यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत अन्नू कपूर यांना कंगना रणौतच्या कानशिलात लगावल्या प्रकरणी एक प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी अन्नू कपूर यांच्या उत्तराने सगळ्यांनाच हैराण केले. काहींना तर हसू देखील आवरलं नाही.


'हमारे बारह' चित्रपटाच्या पत्रकार परिषदेदरम्यान अन्नू कपूर यांना चंदिगड विमानतळावर कंगना राणौतला CISF च्या महिला जवानाने कानशिलात लगावल्याबद्दल प्रश्न विचारला होता. त्यावर उत्तर देताना अन्नू कपूर यांनी म्हटले की, या कंगनाजी कोण आहेत? कोणी मोठ्या अभिनेत्री आहेत का? सुंदर आहेत? असे उत्तर दिले. 


कंगनाने दिले प्रत्युत्तर....


कंगना रणौतने अन्नू कपूर यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. कंगनाने आपल्या  इंस्टाग्राम स्टोरीमध्ये अन्नू कपूर यांच्या वक्तव्याची व्हिडिओ क्लिप शेअर केली करत त्यावर भाष्य केले आहे. कंगनाने म्हटले की, 'तुम्ही अन्नू कपूरजी यांच्याशी सहमत आहात का? ते एका यशस्वी महिलेचा तिरस्कार करतात? जर ती सुंदर असेल तर आम्ही तिचा जास्त तिरस्कार करतो आणि जर ती पॉवरफुल असेल तर तिचा तिरस्कारही करतो. हे खरे आहे का,  असा प्रश्नच कंगनाने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर विचारला आहे. 




 


विमानतळावर कंगनाच्या कानशिलात लगावली...


काही आठवड्यांपूर्वी चंदिगड विमानतळावर सीआयएसएफची महिला जवान कुलविंदर कौरने कंगना रणौतच्या कानशिलात लगावली होती. कंगनाने महिला शेतकरी आंदोलकांविरोधात आक्षेपार्ह भाष्य केले होते, त्याविरोधात कुलविंदरने कंगनाच्या कानशिलात लगावले असल्याचे सांगण्यात आले. 


कंगनाच्या कानशिलात लगावल्याचे प्रकरण घडल्यानंतर काही सेलिब्रिटींनी चिंता व्यक्त केली होती. संगीतकार विशाल दादलानीने कुलविंदरला पाठिंबा देत तिच्या नोकरीसाठी प्रयत्न करणार असल्याचे म्हटले होते. कुठल्याही प्रकराच्या हिंसेचं समर्थन करत नाही, पण त्या महिलेचा राग मी नक्कीच समजू शकतो. जर तिच्या विरोधात सीआयएसएफकडून कोणती कारवाई करण्यात आली तर जर तिची इच्छा असेल तर तिला काम देण्याचं आश्वासन मी देतो, असे विशालने सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले.