Kangana Ranaut In Majha Katta : बॉलिवूडची पंगाक्वीन कंगना रनौत (Kangana Ranaut) कधी सिनेमांमुळे तर कधी तिच्या वक्तव्यांमुळे चर्चत असते. आता एबीपी माझाच्या 'माझा महाकट्टा' या कार्यक्रमात तिने तिच्या सिनेप्रवासाबद्दल भाष्य केलं आहे. हिमाचल प्रदेशातील एका छोट्या खेडातील मुलगी आज बॉलिवूडची सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्री झाली आहे. जाणून घ्या पंगाक्वीनच्या प्रवासाबद्दल...
कंगना रनौत म्हणाली,"बालपणीपासूनच मी खूप जिद्दी आहे. अनेक अभिनेत्रींना एक-दोन वर्षात यश मिळतं. पण मला लोकप्रिय झाल्यानंतर यशस्वी व्हायला आठ ते नऊ वर्षे लागली आहेत. माझा सिनेमाप्रवास नक्कीच सोपा नव्हता. पण कामात सातत्य ठेवण्याचा मी नेहमी प्रयत्न केला".
सिनेप्रवासाबद्दल बोलताना कंगना रनौत म्हणाली,"सिनेमे करण्याचं, अभिनेत्री व्हायचं असं माझं कधीच स्वप्न नव्हतं. एक दिवस मी अभिनेत्री होईल, असा विचारही मी कधी केला नव्हता. हिमालच प्रदेशातील एका छोट्या भागात मी लहानाची मोठी झाले. माझ्या आसपासचं वातावरण हे मुंबईसारख्या शहरांपेक्षा खूप वेगळं होतं. शूटिंग, कलाकार या सर्व गोष्टींपासून मी खूप दूर होते. अभिनेत्रींचंदेखील करिअर असतं हे त्यावेळी मला माहितीचं नव्हतं".
कंगना पुढे म्हणाली,"लहानपणापासूनच मी खूप महत्त्वकांशी होते. त्यामुळे काही कारणाने मी घर सोडलं. त्यानंतर दिल्ली गाठली आणि मॉडेलिंगचा प्रवास सुरू झाला. त्यादरम्यान सिनेमाची ओळख झाली. त्यानंतर ऑडिशन द्यायला सुरुवात केली. माझी सुरुवातीची कामं माझ्या घरच्यांना आवडली नाहीत. पण मला हेच करायचं आहे, हे मी त्यांना स्पष्ट सांगितलं आणि काम सुरू ठेवलं".
कंगना रनौतला होतं मुंबईचं आकर्षण
मुंबईबद्दलच्या आकर्षणाबद्दल कंगना म्हणाली,"मुंबई या शहराचं मला सुरुवातीपासूनच एक आकर्षण होतं. आधी मी लोकल ट्रेन, टॅक्सीमधून प्रवास करत असे. त्यानंतर पैसे कमवल्यानंतर मी स्वत:ची गाडी घेतली, घर घेतलं. त्यावेळी मला जाणवलं की लोकल ट्रेनमधून प्रवास करतानाची मुंबई वेगळी आहे आणि महागड्या गाडीमधून प्रवास करतानाची मुंबई वेगळी आहे. समुद्राचं मला खूप आकर्षण होतं. मी सिनेसृष्टीत पदार्पण केल्यानंतर चांगलं इंग्रजी बोलत नसल्याने अनेक जण माझ्यावर हसायचे".
कंगना म्हणाली,"माझ्या घरचं वातावरण खूप शिस्तीचं होतं. सिनेमा पाहणं म्हणजे वाईट असतं, जे लोक कला शाखा निवडतात ते सिनेमे पाहतात आणि कमी मार्क मिळवतात, असं वातावरण आसपास होतं. सिनेमा पाहण्याची इच्छा व्यक्त केली तरी घरचे नाराज व्हायचे".
संबंधित बातम्या