मुंबई : 'क्वीन' अभिनेत्री कंगना राणावत आणि सुपरस्टार हृतिक रोशन यांच्या कथित प्रेमप्रकरणाचे किस्से अजूनही चवीने चघळले जात आहेत. त्यातच कंगनाने प्रेमात असताना केलेली कविता ऐकवून जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.


सप्टेंबर महिन्यात कंगनाने 'आप की अदालत'मध्ये हृतिकवर बेछूट आरोप केले होते. त्या आरोपांना हृतिकने यथावकाश उत्तरही दिलं. त्यानंतर हा धुरळा शांत झाला, असं वाटत असतानाच पुन्हा कंगनाने जुन्या आठवणी छेडल्या आहेत. अर्थात यावेळी मात्र या गोड गुलाबी आठवणी आहेत.

करण जोहर आणि रोहित शेट्टी यांच्या 'इंडियाज् नेक्स्ट सुपरस्टार' या शोमध्ये कंगनाने हजेरी लावली होती. कंगनाच्या प्रेम प्रकरणाविषयी छेडलं तेव्हा, 'माझ्या प्रेमाचे किस्से तर सगळ्या वर्तमानपत्रांमध्ये लिहिले गेले आहेत' असं उत्तर तिने दिलं.

कंगनाने प्रेमात आकंठ बुडाली असताना केलेली कविताही ऐकवली. 'इश्क की आँखों में खुदा देखा है हमने, ना वो रोशनी थी ना अंधेरा, ना जाने कौनसा मंझर देखा है हमने' अशी कविता कंगनाने सादर केली.

कंगनाचा लग्नाबाबत काय विचार आहे, असा प्रश्न विचारण्यात आला. 'मला समजत नाही, मुलीने तिशी गाठली, की तिचं लग्न व्हायला हवं, असं आपल्या समाजाला का वाटतं. खूप दुर्दैवी आहे हे. मी इतक्यात लग्न करत नाहीये, मी तर अजून तीस वर्षांची पण नाही झाले' असं उत्तर त्यावर कंगनाने दिलं.

घराणेशाहीबाबत करण जोहरसोबत झालेल्या वादावर कंगनाने पडदा टाकल्याचं चित्र आहे. करण-कंगनामध्ये रंगलेल्या वादानंतर दोघं पहिल्यांदाच जाहीर कार्यक्रमात एकत्र आले आहेत.