Kamal Haasan Actor :  भारतीय सिनेसृष्टीत मैलाचा दगड ठरलेल्या 'शोले' (Sholay) या चित्रपटाची आजही चर्चा सुरू असते. 'शोले' (Sholay) या चित्रपटातील संवाद आजही लोकप्रिय आहेत.  या चित्रपटात अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), धर्मेंद्र (Dharmendra), जया बच्चन (Jaya Bachchan), हेमा मालिनी (Hema Malini), संजीव कुमार (Sanjeev Kumar) अशी तगडी स्टारकास्ट होती. या चित्रपटासाठी  आणखी एका सुपरस्टारने काम केले होते. आपल्या वैविध्यपूर्ण भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेले कमल हासन (Kamal Haasaan) यांनी देखील  'शोले'साठी काम केले आहे. बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासमोर कमल हासन यांनी हा किस्सा सांगितला.


कमल हासन यांनी सांगितला किस्सा...


तेलुगू सिनेसृष्टीत कलाकारांना चित्रपटाच्या या पहिल्या शोची तिकीट देण्याची परंपरा आहे. या कार्यक्रमात निर्माते अश्विनी दत्त यांनी अमिताभ बच्चन यांना 'कल्की 2898 एडी'चे तिकीट दिले. त्यानंतर अमिताभ बच्चन यांनी  कमल हासन यांना चित्रपटाचे तिकीट दिले. 


अमिताभ बच्चन यांच्या हस्ते तिकीट मिळाल्यानंतर कमल हासन यांना आनंद झाला. यावेळी त्यांनी एक जुना किस्सा सगळ्यांना सांगितला. 1975 मध्ये आलेल्या 'शोले' चित्रपटात आपण तंत्रज्ञ म्हणून काम केले असल्याचे कमल हासन यांनी सांगितले. मात्र, हा चित्रपट पाहण्यासाठी आपल्याला तीन आठवडे बराच वेळ प्रतीक्षा केल्यानंतर आपल्याला चित्रपटाचे तिकीट मिळाले असल्याचे कमल हासन यांनी सांगितले. 


कमल हासन यांनी सांगितले की, शोले पाहण्यासाठी मी तीन आठवडे वाट पाहावी लागली. चित्रपटाचे तिकीट मला अशा प्रकारे चार-पाच दशकांपूर्वी मिळाले असते तर बरे झाले असते असेही कमल हासन यांनी सांगितले. माझ्या प्रमाणे असंख्य चाहते असतील ज्यांनी शोले पाहण्यासाठी प्रतीक्षा केली. 


अमिताभ बच्चन यांच्याकडून 'फर्स्ट डे फर्स्ट शो'चे तिकीट मिळेल असे मला कधीच वाटले नव्हते. मी तेव्हा चित्रपट तंत्रज्ञ होतो आणि आता अभिनेता आहे. फारसा बदल झालेला नाही असेही कमल हासन यांनी सांगितले. त्यावेळी मी एक तंत्रज्ञ होतो आणि आज एक अभिनेता आहे, याशिवाय काही बदलले नसल्याचे कमल हासन यांनी सांगितले. 


खलनायकाची भूमिका साकारायची होती... 


'कल्की 2898 एडी'मध्ये कमल हासन यांनी  खलनायकाची भूमिका साकारली आहे. याबाबतही बोलताना त्यांनी सांगितले की,''बॅकस्टेजला मी अमितजी समोर रडत सांगायचो  की मला नेहमी खलनायकाची भूमिका करायची होती. खलनायकाला चित्रपटात सर्व चांगल्या गोष्टी करायला मिळतात असेही कमल हासन यांनी गमतीने सांगितले. 'कल्कि 2898 एडी' हा चित्रपट 27 जून रोजी प्रदर्शित होणार आहे.