युवराज आणि राणीचं अफेअर असतं. गावातले प्रस्थापित आमदार आबासाहेब आणि तरूण नेते भेय्यासाहेब यांच्या आमदारकीच्या तिकीटावरून वाद आहेत. या दोघातला कॉमन फॅक्टर आहे गुरूजी. गुरूजी हे आधी आबासाहेबांचे सल्लागार होते. आता ते भैय्यासाहेबांचे आहेत. सत्ताबदल व्हावा असं त्यांना वाटतं. गुरूजींची मुलगी राणी. आणि युवराज हा त्याचा उजवा हात. युवराजला राजकारणात यायचं नाहीय. त्याला शेतकऱ्यांसाठी काम करायचं आहे. आणि मग राजकीय डावपेच आखले जातात. एका गाडीवर गोळ्या झाडल्या जातात. युवराजला मारलं जातं. राणी निवडणूकीला उभी राहते... आता तुम्ही म्हणाल अरे गोष्ट का सांगतोय.. तर मंडळी हे सगळं ट्रेलरमध्ये आहे. त्यामुळे ते सिनेमात कधी दिसतं याची आपण वाट पाहायची. इथे घोळ झालाय.



अपेक्षा बाळगल्या जाव्यात असा मकरंद माने हा दिग्दर्शक आहे. रिंगण हा त्याचा सिनेमा निश्चितच कौतुकास्पद होता. त्यानंतरच्या यंग्राडला चमकदार कामगिरी करता आली नव्हती. पण आता रिंकू राजगुरूला घेऊन त्याने कागरची घोषणा केली तेव्हा पुन्हा एकदा सर्व सिनेप्रेमींच्या अपेक्षा फुलून आल्या. 'कागर' म्हणजे अंकुर. सर्वसाधारणपणे सिनेमा आला की त्याचा आधी ट्रेलर येतो. या चित्रपटाचाही ट्रेलर आला आणि मग मात्र जरा गडबड झाली. या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये अनेक गोष्टी सांगून झाल्या होत्या. त्यामुळे सिनेमात आणखी काही असेल तर ते पाहाणं उत्सुकतेचं होतं. पण सिनेमा बघून झाल्यानंतर लक्षात येतं की सिनेमातल्या अनेक गोष्टी ट्रेलर पाहिल्यामुळे आधीच माहीत झालेल्या असतात, त्यामुळे त्या गोष्टी कधी घडतात याचीच आपण वाट बघू लागतो त्यामुळे सिनेमाची उत्सुकता संपते.

सिनेमाचा पूर्वार्ध नेटका बांधला आहे. व्यक्तिरेखांची निवडही उत्तम. मध्यांतराचा प्रसंगही चकित करणारा. पण उत्तरार्धात मात्र राजकीय शह-काटशह बसण्यापेक्षा तो भाग पाणीदार होत जातो. अनेक प्रसंगांचं असणं कळत नाही. आणि खासकरून उत्तरार्धात आबासाहेबांना झालेली अटकही अनाकलनीय वाटते. प्रस्थापित आमदाराचं पॅकअप झाल्याने त्यातली गंमत जाते आणि गुरूजींचा एकदम गब्बर होतो. आमदाराच्या गाडीवर गोळीबार झाल्यानंतर केवळ तरण्या मुलीच्या मोर्चामुळे आमदाराला अटक होते. बरं, हा हल्ला करून फरार झालेली मंडळी ही कुणाची आहेत, हे पोलीस डोळे लवायच्या आत ओळखू शकतात. त्यामुळे संपूर्ण गेम चेंज होऊ शकतो. पण ते सगळं सोडून आबासाहेबांना अटक करण्यात धन्यता मानण्यात आली आहे. यावर एरवी खूनाच्या, हत्येच्या भाषा बोलणारा आमदारही एकदम गप्प होतो. खरंतर पटकथेत त्यांचं असणं हेच राजकीय डावपेचांना गती देणारं ठरलं असतं. तसं न होता सिनेमा उगाच हिंसक होतो आणि भरकटतो. एका प्रसंगात तर गुरूजीसाठी एका बच्चाला पकडणाऱ्यालाच गुरूजी उगाच गोळ्या घालून मारतात. निवडणूकीच्या तोंडावर इतकं हत्याकांड घडूनही त्याचं पुढं काही होत नाही. म्हणजे, मतदान योग्य पार पडतं हा आणखी मोठा विनोद. असो.

शशांक शेंडे, सुहास पळशीकर आदींनी चांगलं काम केलं आहे. यात शुभंकर तावडे याचीही दखल घ्यायला हवी. त्याचं काम आश्वासक आहे. रिंकू राजगुरूनं राणीची भूमिका साकारली आहे. ती दिसली छान आहे. पण संवादफेकीत मात्र तिचं नवखेपण जाणवतं. तिच्या कणखर भूमिकेने वा संवादफेकीने प्रसंग आणखी जिवंत झाले असते असं वाटून जातं.

सिनेमातली गाणी चांगली आहेत. नागिन डान्स चांगलं जमलं आहे. सर्व गाणी श्रवणीय आहेत पण सिनेमात ती अत्यंत चुकीच्या वेळी येतात आणि सिनेमाचा वेग कमी करतात आणि लांबी वाढवतात. ही गाणी कमी झाली असती तर बरं झालं असतं असं वाटून जातं.

एकूणात पटकथा आणखी कसून बांधली गेली असती.. ट्रेलर नीट कापला असता आणि गाणी कमी झाली असती तर कदाचित सिनेमाचा इम्पॅक्ट आणखी ठाशीव झाला असता. पिक्चरबिक्चरमध्ये या चित्रपटाला मिळताहेत अडीच स्टार्स.