Priyanshu Kshatriya: अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची प्रमुख भूमिका असलेल्या "झुंड" (Jhund) या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारणाऱ्या प्रियांशू क्षत्रिय (Priyanshu Kshatriya) याला चोरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे, अशी माहिती नागपूर शहर पोलिसांनी गुरुवारी (24 नोव्हेंबर) दिली. प्रियांशू हा 18 वर्षाचा आहे. 


मानकापूर भागातील रहिवासी प्रदीप मोंडवे यांनी त्यांच्या घरातून 5 लाख रुपये किमतीचे दागिने आणि रोकड चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी एका अल्पवयीन संशयितास पकडले. त्या व्यक्तीनं गुन्ह्यात क्षत्रियचा सहभाग असल्याचा दावा केला. मंगळवारी (22 नोव्हेंबर) त्याला अटक करण्यात आली, असंही पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं. 


प्रियांशू क्षत्रियला न्यायालयात हजर त्याला 25 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. चोरी करण्यात आलेल्या वस्तू या  गड्डीगोदाम परिसरात एका पेटीत सापडल्या, असंही पोलिसांनी सांगितलं. 


पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की,  प्रियांशू क्षत्रियला यापूर्वी रेल्वे प्रवाशांचे मोबाइल फोन चोरल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. 


झुंड सिनेमाचे दिग्दर्शन नागराज मंजुळेंनी केले आहे. हा एक स्पोर्ट्स ड्रामा आहे. या सिनेमात अमिताभ बच्चन यांनी निवृत्त क्रीडा प्रशिक्षक विजय बारसे यांची भूमिका साकारली होती. हा सिनेमा 4 मार्च 2022 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाने चांगलीच कमाई केली आहे. 


किच्चन कल्लाकारमध्ये लावली होती हजेरी  


प्रियांशूनं झुंड चित्रपटाच्या टीमसोबत किच्चन कल्लाकार या शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी प्रियांशूनं झुंड चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचे किस्से देखील सांगितले होते. 






वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


Entertainment News Live Updates 25 November : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!