Jhony Lever : बॉलीवूडमधील (Bollywood) दिग्गज अभिनेते आणि विनोदवीर जॉनी लिव्हर (Jhony Lever ) यांची संपूर्ण सिनेसृष्टीतली ओळख ही लोकांना हसवण्यासाठी म्हणून आहे. पण याच विनोदवीराच्या आयुष्यातला वाईट काळ देखील तितकाच वेदनादायी आहे. जॉनी लिव्हर यांनी 1980 मध्ये सिनेसृष्टीत पदार्पण करत अनेक मोठ्या सिनेमांमध्ये काम केलं. बाजीगर, राजा हिंदुस्तानी, दुल्हे राजा, बादशाह, आमदनी अट्ठानी खर्चा रुपैया, खट्टा मीठा, गोलमाल, दे दना दन अशा अनेक चित्रपटांमधून जॉनी यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. 


युट्युबर रणवीर अल्लाहबादियासोबत जॉनी यांनी टीआरएस या कार्यक्रमामध्ये संवाद साधला. या मुलाखतीदरम्यान जॉनी यांनी त्यांच्या आयुष्यातील पडत्या काळावर भाष्य केलं. एक काळ असा होता जेव्हा मी काही पैसे कमावले कीच मला खायला मिळायचं असं देखील जॉनी यांनी यावेळी सांगितलं. तसेच वयाच्या 13 व्या त्यांनी घेतलेल्या आत्महत्येच्या निर्णयाविषयी देखील त्यांनी यावेळी भाष्य केलं. 


वडिलांसोबत होते वाद


त्यांच्या या काळाविषयी बोलताना जॉनी यांनी म्हटलं की, माझ्या बालपणीचा काळ हा फार कठिण होता. माझ्यावर माझ्या कुटुंबियांची देखील जबाबदारी होती. जेव्हा मी काही काम करुन पैसे आणायचो तेव्हाच माझ्या घरात अन्न शिजायचं. माझ्या वडिलांनी कसलीच जबाबदारी घेतली नाही. ते त्यांच्या मित्रांसोबत मौज करायचे. कधीकधी मला भीती वाटायची की माझे वडिल जिंवत घरी येतायत की नाही. 


'मी आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला'


मी वयाच्या 13 वर्षी स्वत:चं आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला होता. मी माझ्या वडिलांना वैतागून रेल्वेच्या खाली जाऊन आत्महत्या करणार होता. त्यासाठी मी रेल्वेच्या ट्रॅकवर झोपलोही. पण त्यावेळी माझ्या डोळ्यासमोर माझ्या बहिणींचे चेहरे आले आणि मी लगेच तिथून बाजूला झालो, हा आयुष्यातील वेदनादायी प्रसंग जॉनी यांनी या मुलाखतीदरम्यान सांगितला. 


तेव्हा मी शाहरुखपेक्षा जास्त लोकप्रिय होतो 


या मुलाखतीदरम्यान जॉनी लिव्हर यांनी म्हटलं की, 1993 मध्ये जेव्हा बाजीगर हा चित्रपट आला होता, तेव्हा मी शाहरुखपेक्षा जास्त लोकप्रिय होतो. बाजीगर आधी शाहरुख राजू बन गया जेंटलमेन सारख्या चित्रपटांमध्ये पाहायला मिळाला होता. पण त्यावेळी मी शाहरुखपेक्षा जास्त लोकांना माहित होतो. जेव्हा बाजीगर बनत होता, तेव्हाही लोकं मला शाहरुखपेक्षा जास्त ओळखत होते. तेव्हा मी स्टार होतो आणि शाहरुख वर येत होता. पण तरीही सेटवर आमची तितकीच चांगली मैत्री होती. 


ही बातमी वाचा : 


Johny Lever on Shah Rukh Khan: शाहरुखपेक्षा मी जास्त लोकप्रिय होतो, आज त्याच्याकडे जे काही आहे... जॉनी लिव्हर यांचं मोठं वक्तव्य