Jaya Bachchan Amitabh Bachchan :   बॉलिवूडमध्ये असे काही चित्रपट आहेत, ज्यांनी बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही पण वेगवेगळ्या कारणांनी हे चित्रपट लोकांच्या मनात आहेत. चित्रपटातील संवाद, संगीत, गाणी किंवा त्याच्याशी निगडीत काही वादांनी हे चित्रपट चर्चेत असतात. यश चोप्रा (Yash Chopra) यांनी  दिग्दर्शित केलेला 'सिलसिला'  चित्रपटदेखील स्टारकास्ट, गाणी यासाठी आजही लोकांच्या लक्षात आहे. 


'सिलसिला' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकला नाही. चित्रपटातील गाणी, स्टारकास्टमुळे हा चित्रपट बॉलिवूडमधील एक संस्मरणीय चित्रपट ठरला. या चित्रपटात अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), जया बच्चन (Jaya Bachchan), रेखा (Rekha), संजीव कुमार (Sanjeev Kumar) आणि शशी कपूर (Shashi Kapoor) सारख्या दिग्गज कलाकारांच्या भूमिका या चित्रपटात होत्या. 


अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्या प्रेमप्रकरणाची चर्चा जोरात सुरू असताना या चित्रपटात या दोघांसह जया बच्चन यांचीही वर्णी लागली होती. मात्र, जया यांची चित्रपटातील एन्ट्री ऐनवेळी झाल्याचे म्हणतात. जया बच्चन यांच्या ऐवजी दुसऱ्याच अभिनेत्रीची निवड करण्यात आली होती.  मात्र, या अभिनेत्रीला चित्रपटातून वगळण्यात आले होते. 


कोणत्या अभिनेत्रीला जया बच्चन यांनी रिप्लेस केले?


बॉलिवूडमध्ये खलनायक म्हणून ठसा उमटवलेले ज्येष्ठ अभिनेते रंजीत यांनी एएनआयला दिलेल्या मुलाखतीत सिलसिला चित्रपटाबद्दल उलगडा केला आहे. सिलसिलामध्ये रेखा आणि अमिताभ यांच्यासोबत परवीन बाबीला निवडण्यात आले होते. मात्र चित्रपटातून परवीनला वगळण्यात आले आणि तिच्याऐवजी जया बच्चन यांची वर्णी लागली. रंजीतने परवीनला का वगळले, याचा सूचक इशाराही दिला. 


चित्रपटातून परवीन बाबीला का काढले?


रंजीत यांनी सांगितले की, परवीन ही माझी खास मैत्रिण होती. ती एकटी असली तिच्या चेहऱ्यावर स्मित हास्य असायचे. एकदा ती खूपच चिंतेत होती आणि रडत होती. त्यावेळी आम्ही चित्रपटाच्या शूटिंगसाठी काश्मीरमध्ये होतो. त्यावेळी मी तिला काय झाले हे विचारले. त्यावेळी तिने सांगितले की, सिलसिला चित्रपटात मला घेण्यात आले होते. मात्र, अचानकपणे बाहेर काढण्यात आले असल्याचे तिने सांगितले. एका रचलेल्या वादामुळे  जया बच्चनची चित्रपटात एन्ट्री झाली. अन्यथा या चित्रपटात अमिताभ, रेखा आणि परवीन दिसले असते. 


परवीन बाबीने आपल्या सिने कारकिर्दीत अनेक चांगल्या चित्रपटात काम केले. अमिताभसोबत तिची जोडी कमालीची यशस्वी ठरली. परवीन बाबी ही 70 ते 80 च्या दशकात आघाडीची नायिका होती. जानेवारी 2005 मध्ये परवीन बाबीचे निधन झाले.