मुंबई : लॉकडाऊननंतर सगळ्याच इंडस्ट्रीजची अर्थकारणं बदलली आहेत. अनेकांना लॉकडाऊनमुळे मोठा फटका बसल्याने अनेकांनी आपआपल्या प्रोजेक्ट्सच्या किमती कमी केल्या आहेत. बजेटं कमी झाली आहेत. मनोरंजन सृष्टीवर लॉकडाऊनचा परिणाम झालाचं पण तो व्यक्तिगत आयुष्यावरही झाल्याचं दिसतं. म्हणजे अनेकांना घरी बसावं लागलं. येणारा पैसा बंद झाल्यानं अनेकांवर हालाखीची परिस्थिती आली. पण सिनेमांचा विचार करता, अनेकांनी आपले थांबवलेले प्रोजेक्टस पुन्हा एकदा जोमानं सुरु करायचं ठरवलं आहे. अनेक मोठ्या सिनेमांना तितक्याच जोमात सुरूवात झाली आहे.


आगामी मोठ्या चित्रपटांमध्ये उल्लेख करायला हवा तो गंगूबाई काठेयावाडी, आदिपुरूष, बेल बॉटम, बच्चन पांडे आदी चित्रपटांचा. पण त्याच्यावर आता एक कडी करणारा सिनेमा येणार आहे. त्या चित्रपटाचं नाव आहे ब्रह्मास्त्र. अयान मुखर्जी दिग्दर्शित हा चित्रपट चित्रिकरण सुरू झाल्यापासूनच चर्चेत आहे. 2018 मध्ये या चित्रपटाचं चित्रिकरण सुरू झालं. खरंतर हा चित्रपट प्रदर्शित होणार होता डिसेंबर 2020 मध्ये. पण लॉकडाऊन आला आणि सगळ्यालाच खीळ बसली. रणबीर कपूर आणि अलिया भट पहिल्यांदाच या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आले आहेत. लॉकडाऊनमुळे लागलेलं ग्रहण आता सुटतं आहे. पण या सिनेमाचं बजेट प्रचंड वाढलं आहे. निर्मात्यांनीही याला दुजोरा दिला आहे.


वरुणच्या कुलीचा ट्रेलर आला, सिनेमा येणार 25 डिसेंबरला


ब्रह्मास्त्र या चित्रपटात रणबीर कपूर, अलिया भट यांच्यासह नागार्जुन, डिंपल कपाडिया आदी कलाकार आहेत. त्यामुळे मोठे कलाकार घेतल्यामुळे आधीच या सिनेमाचं बजेट वाढलं आहे. आता लॉकडाऊनमुळे त्यात भर पडली आहे. या सिनेमाचं बजेट 300 कोटींवर गेल्याची चर्चा आहे. याबद्दल चित्रपटाचे निर्मात्यांना विचारलं असता ते 300 कोटींचा आकडा तर सांगतातच. पण चित्रपटाचं बजेट 300 कोटीच्या खूपच वर गेल्याचंही कबूल करतात. म्हणूनच भारतात बनणारा हा सर्वात महागडा चित्रपट असेल असा दावा ते करतायत. पण हा चित्रपट बनवण्यासाठी नेमका किती खर्च आलाय तो आकडा सांगण्यास मात्र ते नकार देतायत. आता हा चित्रपट जवळपास पूर्णत्वाला आला आहे. किरकोळ पॅचवर्क झाल्यानंतर न्यू नॉर्मलमध्ये योग्य वेळ साधून हा चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार आहे. त्यासाठी नव्या वर्षाची वाट पाहावी लागणार आहे.