मुंबई : डेव्हिड धवन आणि गोविंदाची जोडी त्यावेळी सातव्या आसमांवर होती. हे दोघे करतील तो चित्रपट हिट होत होता. यातलाच एक सिनेमा होता कुली नंबर 1. 1995 ला आलेला हा सिनेमा कमाल गाजला. कारण त्यावेळी नंबर 1 च्या साखळीत तयार होणारा प्रत्येक सिनेमा गाजत होता. यात अंटी नंबर 1, कुली नंबर 1, हिरो नंबर 1 असे अनेक सिनेमे झाले. आता त्यातलाच कुली नंबर 1 आता पुन्हा एकदा प्रदर्शित होणार आहे. पण हा जुना सिनेमा नसून आता तो नव्याने येतो आहे. यात कुलीची गोविंदाने साकारलेली भूमिका साकारतो आहे अभिनेता वरुण धवन. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच आला.


डेव्हिड धवन यांनी आपल्या मुलाला, वरुणला सोबत घेऊन जुने सिनेमे नव्याने करायला घेतले आहेत. यातला पहिला प्रयोग कमालीचा यशस्वी झाला. जुडवा 2 या चित्रपटाने कमाल लोकप्रियता मिळवली. आधी या सिनेमात सलमान खान, रंभा आणि करिष्मा होती. तर या नव्या चित्रपटात वरूण धवनसोबत होत्या तापसी पन्नू आणि जॅकलिन फर्नांडिस. आता त्यापाठोपाठ कुली नंबर 1 हा सिनेमा येतो आहे. या सिनेमात वरुण धवन याच्यासोबत आहे सारा अली खान. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला. 1995 मध्ये गाजलेल्या चित्रपटाची गाणीही तितकीच गाजली होती. मै तो रस्ते से जा रहा था, हुस्न है सुहाना.. अशी बरीच गाणी गाजली होती. ही सगळी गाणी या नव्या सिनेमातही घेण्यात आली आहेत. अपेक्षेप्रमाणे नवा सिनेमा जास्त चकाचक आहे. ट्रेलरमध्ये वरुण धवन तर देखणा दिसतोच शिवाय , सारा अली खानच्या दिसण्याचाही यात पुरेपूर वापर करुन घेण्यात आला आहे.


कुली नंबर 1 मध्ये वरुण, सारा यांच्यासोबत परेश रावल, राजपाल यादव, जावेद जाफरी आदी कलाकारही असणार आहेत. हा चित्रपट अमेझॉन प्राईमवर 25 डिसेंबरला रिलीज होतोय. हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित करावा की नाही याबद्दल साशंकता होती. यामध्ये वडील डेव्हिड आणि वरूण यांच्या मतभिन्नताही होती. ओटीटीवर इतर सिनेमांना मिळालेला प्रतिसाद पाहता हा चित्रपट थिएटरमध्येच रिलीज करावा असा हट्ट वरुणचा होता. तर डेव्हिड आणि वाशू भग्नानी यांना मात्र आता सिनेमा ओटीटीवर आणावा असंच वाटत होतं. अखेर दोघांचा सुवर्णमध्य काढत ओटीटीवर सिनेमा रिलीज करताना तो डिसेंबरमध्ये रिलीज करण्यावर एकमत झालं होतं.