मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टीतील जादूगार संगीतकार आर. डी. बर्मन अर्थात पंचमदा यांचा 27 जून 1939 हा जन्मदिवस. वयाच्या अवघ्या 54 व्या वर्षी या अवलियाने जगाला अलविदा केलं. सुप्रसिद्ध पार्श्वगायिका आशा भोसले यांचे पती आणि संगीत दिग्दर्शक सचिन देव बर्मन यांचे सुपुत्र अशीही त्यांची ओळख. पंचमदांच्या 77 व्या जन्मदिनानिमित्त गुगलने डूडल रेखाटून त्यांना अनोखी श्रद्धांजली वाहिली आहे.

 



पंचमदा यांच्या स्मृतिदिनानिमित्त 10 रंजक गोष्टी


1. वयाच्या 9 व्या वर्षी आर. डी. बर्मन यांनी पहिल्यांदा गाणं संगीतबद्ध केलं. 'ऐ मेरी टोपी पलट के आ' हे गाणं काही वर्षांनी (1956 मध्ये) त्यांचे पिता एस. डी. बर्मन यांनी फंटूश चित्रपटात वापरलं. तर 'सर जो तेरा चक्राये' हे गुरु दत्तच्या प्यासा (1957) मध्ये वापरलं गेलं.

 
2. हेमंत कुमार यांच्या आवाजातील 'है अपना दिल तो आवारा' गाण्याला रसिकांची पसंती मिळाली. मात्र 'सोलवा साल'मधील या गाण्यातलं माऊथ ऑर्गन खुद्द पंचमदा यांनी वाजवलं होतं.

 
3. इलेक्ट्रॉनिक वाद्यांचा वापर पंचमदांनी पहिल्यांदा सिनेमामध्ये केला. तिसरी मंजिल चित्रपटातील गाजलेल्या 'ओ मेरे सोना रे..' या गाण्यासाठी आर. डींनी पहिल्यांदा ही वाद्यं वापरली.

 
4. पावसाच्या थेंबांचा आवाज मिळवण्यासाठी तर पंचमदांनी कमालच केली. पाऊस पडताना अख्खी रात्र घराच्या बाल्कनीत बसून त्यांनी मनाजोगता आवाज मिळवला आणि रेकॉर्ड केला.

 
5. 'चुरा लिया है तुमने जो दिल को..' गाण्यातील संगीताला अनेक श्रोत्यांनी दाद दिली. गाण्याच्या सुरुवातीच्या पीसमध्ये ग्लासवर चमचा वाजवून आर. डी. बर्मन यांनी आवाज निर्माण केला होता.

 
6. त्याकाळी संगीतकारांमधील स्पर्धा तीव्र असली तरी लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्यासाठी 'दोस्ती' चित्रपटात आणि कल्याणजी-आनंदजी यांच्यासाठी दुसऱ्या एका चित्रपटात पंचमदांनी माऊथ ऑर्गन वाजवला.

7. 'बिती ना बितायी रैना' हे गाणं आर. डींनी एका हॉटेलच्या रुममध्ये संगीतबद्ध केलं होतं. परिचय चित्रपटातील गाण्यासाठी लता मंगेशकर आणि भूपिंदर या दोघांनाही राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.

 
8. मेहमूदच्या 'भूत बंगला' या चित्रपटातून आर. डी. बर्मन पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर झळकले.

 
9. 'अब्दुल्ला' चित्रपटातील एका गाण्यासाठी पंचमदांनी एक फुगा बांबूला बांधून त्याची सुरावट निर्माण केली.

 
10. ब्राझिलियन बोसा नोवा रिदम हिंदी सिनेमात आणणारे पंचमदा पहिलेच संगीतकार. पती पत्नी या चित्रपटात आशाजींनी गायलेल्या 'मार डालेगा दर्द ए जिगर' गाण्यासाठी हा ठेका वापरला गेला.