Bollywood Celebrities Tribute To Sunil Chhetri: भारताच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री (Sunil Chhetri) याने अखेर आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेतली आहे. भारत आणि कुवेत यांच्यातील फिफा विश्वचषक 2026 पात्रता फेरीत गुरुवारी छेत्रीने शेवटचा सामना खेळला. क्रिस्टियानो रोनाल्डो, अली दाई आणि लिओनेल मेस्सी यांच्यानंतर 39 वर्षीय छेत्री जगातील चौथा सर्वाधिक गोल करणारा खेळाडू मानला जातो. छेत्रीने आपल्या दोन दशकांहून अधिक काळच्या कारकिर्दीत भारतासाठी 94 गोल केले आहेत. दरम्यान त्याच्या निवृत्तीच्या निर्णयानंतर बॉलीवूडकरांनीही (Bollywood Celebrity) भावूक प्रतिक्रिया दिल्या आहेत.
क्रिकेटप्रमाणेच फुटबॉल देखील अनेकांच्या आवडीचा विषय आहे. त्यामुळे सुनील छेत्रीच्या निर्णयामुळे फुटबॉलच्या चाहत्यांना देखील धक्का बसलाय. दरम्यान त्याच्या निवृत्तीच्या निर्णयानंतर क्रिडा विश्वातूनच नव्हे तर कलाविश्वातून देखील प्रितिक्रिया समोर येत आहे. अर्जुन कपूर, अभिषेक बच्चन यांसह अनेकांनी त्याच्यासाठी पोस्ट केल्यात.
बॉलीवूडकरांच्या भावूक प्रतिक्रिया
अर्जुन कपूर फुटबॉलचा मोठा चाहता आहे. त्याने त्याच्या सोशल मीडियावर सुनील छेत्रीचा एका फोटो पोस्ट केला आहे. तसेच त्यावर त्याने भावुक असं कॅप्शन देखील दिलंय. त्यावर त्याने एका युगाचा अंत, सुनील छेत्री धन्यवाद, आठवणी, उत्कटता आणि तुझ्या डेडीकेशनसाठी. दरम्यान अर्जुनसोबत अभिषेक बच्चनने देखील त्याच्यासाठी पोस्ट केलीये. अभिषेकने सुनीलचा आतापर्यंतच्या भारतीय खेळाडूंपैकी एक महान खेळाडू असा उल्लेख केला आहे. पुढे अभिषेकने म्हटलं की, कॅप्टन तुझ्या या यशस्वी करिअरसाठी तुझं खूप खूप अभिनंदन. तुला देशासाठी खेळताना पाहणं हा आमच्यासाठी खूप अभिमानास्पद क्षण होता. देशातील एका महान खेळाडूला धन्यवाद. तसेच फरहान अख्तरने देखील सुनीलला त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
सुनील छेत्रीची कारकीर्द
सुनील छेत्रीची आंतरराष्ट्रीय कारकीर्द खूप चांगली राहिलेली आहे. सुनील छेत्रीने त्याच्या आंतरराष्ट्रीय फुटबॉल कारकिर्दीत 151 सामने खेळले, ज्यामध्ये त्याने 94 गोल केले. आजपर्यंतच्या इतिहासात भारतीय संघासाठी सर्वाधिक 4 हॅटट्रिक करणारा खेळाडू देखील सुनील होता. छेत्री हा आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये जगातील चौथा सर्वाधिक गोल करणारा खेळाडू होता. या यादीत पोर्तुगालचा क्रिस्टियानो रोनाल्डो (128), इराणचा अली दाई (108) आणि अर्जेंटिनाचा लिओनेल मेस्सी (106) त्याच्यावर आहे.