1. तब्बल 120 मराठी सिनेमे रिलीज
मराठी फिल्म इंडस्ट्रीसाठी हे वर्ष शंभरी पलीकडे जाणारं होतं. शंभरी पलीकडे म्हणजे यावर्षी तब्बल 120 मराठी सिनेमे रिलीज झाले. प्रत्येक आठवड्याला सरासरी 2 ते 3 सिनेमे थिएटरवर झळकले पण यात यशाचं प्रमाण मात्र अत्यल्प होतं.
2. मराठी सिनेमाची ऐतिहासिक हॅट्रिक
2018 मध्ये मराठी सिनेमासाठी घडलेली ऐतिहासिक गोष्ट म्हणजे बॉक्स ऑफिसवर झालेली हॅट्रिक. वर्ष संपता-संपता डॉ. काशिनाथ घाणेकर, नाळ आणि मुळशी पॅटर्न हे तीन सिनेमे सलग रिलीज झाले आणि तिघांनीही जबरदस्त यश मिळवलं. नाळ आणि काशिनाथ घाणेकर सिनेमांनी तर 20 कोटींचा आकडा ओलांडला.
3. माधुरी दीक्षित मराठीमध्ये
बकेट लिस्ट या सिनेमाच्या निमित्ताने धकधक गर्ल माधुरी दीक्षितचा जलवा मराठी सिनेमात पाहायला मिळाला. गेली कित्येक वर्षं माधुरी दीक्षितच्या मराठी सिनेमाची फक्त चर्चा सुरु होती. पण ते सत्यात 2018 मध्ये उतरलं.
4. गुजरातीमध्ये मराठीचा डंका
या वर्षी तीन मराठी सिनेमांचा गुजराती भाषेत रिमेक करण्यात आला. व्हेंटिलेटर, नटसम्राट, चि. व चि. सौ. हे तीन सिनेमे होते. विशेष म्हणजे हे तीन्ही सिनेमे बॉक्स ऑफिसवर चांगलेच यशस्वी ठरले.
5.तिसरा भाग येणारा पहिला मराठी सिनेमा
मराठीमध्ये आजवर एखाद्या सिनेमाचे दोन भाग आले होते मात्र मुंबई-पुणे-मुंबई च्या निमित्ताने पहिल्यांदाच एखाद्या सिनेमाचा तिसरा भाग आला. मराठीमध्ये पहिल्यांदाच ही गोष्ट घडली.
6. कुठे होत्या सोनाली, सई, अमृता?
मराठीतील आघाडीच्या स्टार म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं त्या अमृता खानविलकर, सोनाली कुलकर्णी यांचा एकही मराठी सिनेमा या वर्षात आला नाही. तर सई ताम्हणकरनेही राक्षस हा वर्षाच्या अगदी सुरुवातीला आलेला एकमेव सिनेमा केला.
7.‘बिग बॉस’ची मराठीमध्ये एण्ट्री
जगभरातला सर्वात वादग्रस्त शो म्हणून ज्याकडे पाहिला जातं तो बिग बॉस सरत्या वर्षात मराठी टेलिव्हिजनवर दाखल झाला. या शोच्या पहिल्या पर्वाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद पाहायला मिळाला. मेघा धाडे या पहिल्या पर्वाची विजेती ठरली.
8. आणखी एक मराठी चॅनेल
मराठी टेलिव्हिजनच्या विश्वात 2018 मध्ये एका नव्या मनोरंजन वाहिनीने प्रवेश केला. सोनी ग्रूपचं सोनी मराठी हे नवं चॅनेल लाँच झालं.
9. देवबाभळी थेट ‘फोर्ब्ज’मध्ये
या वर्षात रंगभूमीवर देवबाभळी नाटकाचा बोलबाला दिसून आला. भद्रकालीच्या या नाटकाची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली. प्रतिष्ठेच्या फोर्ब्ज मासिकाने एका खास आर्टिकलमध्ये या मराठमोळ्या नाटकाचं कौतुक केलं.
10.‘अलबत्त्या गलबत्त्या’ नाटकाचा विक्रम
मराठी रंगभूमीच्या बाबतीत घडलेली आणखी एक गोष्ट म्हणजे झी मराठीने नाट्य निर्मितीत टाकलेलं पाऊल. झीच्या निमित्ताने पहिल्यांदाच एखादी कॉर्पोरेट कंपनी नाट्यनिर्मितीच्या क्षेत्रात उतरली. या संस्थेची निर्मिती असलेल्या अलबत्त्या गलबत्त्या या नाटकाने एकाच थिएटरमध्ये, एकाच दिवशी, एकाच टीमसोबत सलग पाच प्रयोग करण्याचा विक्रम केला.
2018 साली मराठी सिनेसृष्टीत घडलेल्या 10 घडामोडी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
31 Dec 2018 12:47 PM (IST)
यावर्षी तब्बल 120 मराठी सिनेमे रिलीज झाले. प्रत्येक आठवड्याला सरासरी 2 ते 3 सिनेमे थिएटरवर झळकले पण यात यशाचं प्रमाण मात्र अत्यल्प होतं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -