दीपिका कक्कर इब्राहिम बिग बॉस 12ची विजेती
एबीपी माझा वेब टीम | 31 Dec 2018 08:01 AM (IST)
अंतिम तिघांमध्ये दीपिका, श्रीशांत आणि दिपकमध्ये चुरस होती. यावेळी दिपकने 20 लाख रुपये घेत स्वतःहून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. यामुळे शोमधील बहीणभावाची जोडी असलेली श्रीशांत-दीपिकाची जोडी अंतिम दोनमध्ये पोहोचली.
मुंबई : टेलिव्हिजनची स्टार असलेली दीपिका कक्कर इब्राहिम बिग बॉसच्या 12व्या सीझनची विजेती ठरली आहे. तर भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू एस. श्रीशांत उपविजेता ठरला. 'ससुराल सिमर का' या मालिकेतली 'सिमर' ची दीपिकाने केलेली भूमिका प्रेक्षकांच्या विशेष लक्षात राहिली होती. दीपिकाच्या विजयाची औपचारिक घोषणा या शोचा होस्ट अभिनेता सलमान खानने केली. बिग बॉस 12 च्या विजेतेपदासाठी दीपिका कक्कर, श्रीसंत, दिपक ठाकूर, कणवीर बोहरा, रोमील चौधरी हे प्रबळ दावेदार मानले जात होते. मात्र करणवीर सर्वात आधी फायनलमधून बाहेर फेकला गेला. अंतिम तिघांमध्ये दीपिका, श्रीशांत आणि दिपकमध्ये चुरस होती. यावेळी दिपकने 20 लाख रुपये घेत स्वतःहून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. यामुळे शोमधील बहीणभावाची जोडी असलेली श्रीशांत-दीपिकाची जोडी अंतिम दोनमध्ये पोहोचली. फायनल सुरू झाल्यापासूनच दीपिकाचं नाव सोशल मीडियावर ट्रेन्ड होत होतं. तर श्रीशांतच विजेता असल्याच्या बातम्या लीक झाल्या होत्या. अखेर विजेत्याचं नाव घोषित करण्याची वेळ आली तेव्हा बिग बॉसच्या घराचे लाइट्स बंद करून बाहेर या असं सलमान खानने श्रीशांत आणि दीपिकाला सांगितलं. काही क्षणातचं दीपिका विजेती असल्याची घोषणा केली. त्याक्षणी दीपिकाला आनंदाचा धक्काच बसला. सलमान आणि श्रीशांत दोघांनीही दीपिकाचं अभिनंदन केलं. संपूर्ण सीझनमध्ये दीपिका आणि श्रीशांत खूप चांगले मित्र झाले होते. 105 दिवस बिग बॉसच्या या सीझनने दर्शकांना खिळवून ठेवलं होतं. बिग बॉसच्या 11 व्या पर्वाची विजेती मराठमोळी शिल्पा शिंदे ठरली होती.