नवी दिल्ली:  तामिळनाडूतील प्रसिद्ध 'जलीकट्टू' या पारंपारिक खेळावर सुप्रीम कोर्टाने 2014 मध्ये बंदी घातली आहे. मात्र तामिळनाडूचे मुख्यमंत्री पन्नीरसेल्वम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून, ही बंदी हटवण्याची मागणी केली आहे.


एकीकडे मुख्यमंत्र्यांनी ही मागणी केली असताना, अभिनेत कमल हसननेनेही जलीकट्टूची बाजू घेतली आहे.

"जर प्राणीप्रेमी जलीकट्टूवरुन इतके व्यथित झाले असतील, तर त्यांनी एक पाऊल आणखी पुढे टाकावं आणि बिर्याणीवरही बंदी आणावी" असं कमल हसनने म्हटलं आहे.

जलीकट्टू हा पारंपारिक खेळ आहे. मी स्वत: हा खेळ खेळलो आहे. मी खवळलेल्या बैलाशी झुंज दिली आहे. मी तमिळी आहे आणि मला हा खेळ आवडतो, असंही कमल हसनने नमूद केलं.

काय आहे जलीकट्टू?

जलीकट्टू हा तामिळनाडूतील सुमारे 400 वर्षांपूर्वीचा पारंपारिक खेळ आहे. पीकं कापणीच्यावेळी हा खेळ खेळला जातो. यामध्ये 300-400 किलोच्या बैल/सांड यांच्या शिंगांना नोटा बांधल्या जातात. त्यानंतर बैलाला भुजवून चिडवलं जातं आणि गर्दीत सोडून देतात.

या खेळात भाग घेणाऱ्यांनी त्या बैलांची शिंगं पकडून त्याला शांत करायचं असतं.



प्राणीप्रेमींचा आरोप

बैलांना चिडवण्यासाठी त्यांना मद्य पाजून,  मारहाण करुन उसकावलं जातं असा आरोप प्राणीमित्र संघटनांचा आहे. अशा पिसाळलेल्या बैलाला काही अंतरावरच रोखण्याचा हा खेळ आहे. फक्त स्पेनमधल्या बुल फाईटप्रमाणे इथे बैलाला जीवे मारलं जात नाही. बैलगाडी शर्यतींमध्येही अशा पद्धतीने बैलांना मारहाण होत असल्याचा आरोप आहे.