Ideas of India Summit 2023: पाकिस्तानमध्ये जाऊन पाकिस्तानलाच सुनावल्यानंतर त्या देशाची नेमकी परिस्थिती काय आहे, पाकिस्तानातील नागरिकांचं भारताबद्दल मत काय आहे, ते कशा पद्धतीचं जीवन जगतात या आणि अशा अनेक गोष्टींवर प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर भरभरुन बोलले. एबीपी नेटवर्कच्या (ABP Network) 'आयडियाज ऑफ इंडिया समिट 2023' (Ideas of India Summit 2023) परिसंवादामध्ये गीतकार  जावेद अख्तर यांनी हजेरी लावली. यावेळी लेखक चेतन भगत (Chetan Bhagat) यांनी जावेद अख्तर (Javed Akhtar) यांची मुलाखत घेतली.


गीतकार जावेद अख्तर यांनी काही दिवसांपूर्वी पाकिस्तान या देशाला भेट दिली. पाकिस्तानमध्ये गेल्यावर कसा अनुभव आला? असा प्रश्न चेतन भगत  यांनी जावेद अख्तर यांना विचारला. या प्रश्नाचं उत्तर देत जावेद अख्तर म्हणाले, 'उर्दू कवींचा तिथे मोठा महोत्सव होता. 2018 मध्ये मी पहिल्यांदा त्या महोत्सवाला हजेरी लावली. त्यानंतर यावर्षी देखील मी या फेस्टिव्हलमध्ये हजेरी लावली. त्या कार्यक्रमात प्रश्न-उत्तराचं सत्र सुरु होतं. खूप लोक तिथे बसले होते. ते लोक मला प्रश्न विचारत होते. तेव्हा एका महिलेनं मला प्रश्न विचारला की, आम्ही तुम्हाला एवढं प्रेम करतो. पण तुम्ही समजता की प्रत्येक पाकिस्तानी हा आतंकवादी आहे. तिथे खूप कमी जागा होती. त्यामुळे मी तिथून निघून जाऊ शकत नव्हतो. त्यामुळे मी त्या महिलेच्या प्रश्नाचं उत्तर दिलं. मी खूप शांतपणे त्यांना उत्तर दिलं.'


'त्यांना उत्तर दिल्यानंतर मी जेव्हा भारतात परत आलो तेव्हा मला वाटलं की, मी तिसरं महायुद्ध जिंकून आलो आहे. कारण लोक, मीडिया यांनी दिलेली रिअॅक्शन मी पाहिली. त्यानंतर मी लोकांचे फोन घेणं बंद केलं. मला वाटलं की, असा काय मी तीर मारला आहे?'


'आपण ज्या देशात जन्म घेतला, ज्या देशात राहतो, ज्या देशात मरणार आहोत, त्या देशात आपण अशा संवेदनशील गोष्टींबद्दल बोलतो. तर ज्या देशात आपण केवळ दोन दिवस आहोत, तिथे संवेदनशील गोष्टींबद्दल बोलं तर या फरक पडतो? जर आपल्या देशात बोलायला घाबरत नाही तर तिथे जाऊन का घाबरायचं?' असंही त्यांनी सांगितलं. 


पाकिस्तानातील आर्थिक स्थितीबाबत देखील जावेद अख्तर यांनी चर्चा केली. 'मी तीन वेळा पाकिस्तानात गेलो आहे. पाकिस्तानातील शहरांमध्ये गरीबांची घरं, रस्त्यांवर बसलेली गरीब माणसं दिसत नाहीत. त्यांनी तशी सिस्टिम केली असावी.' असं त्यांनी सांगितलं. 


एबीपी नेटवर्क 'आयडियाज ऑफ इंडिया'
एबीपी नेटवर्कच्या (ABP Network) 'आयडियाज ऑफ इंडिया' (ABP Ideas Of India) हा परिसंवाद 25 आणि 26 फेब्रुवारी रोजी मुंबईमध्ये (Mumbai) पार पडणार आहे. यंदा या कार्यक्रमाचं दुसरं वर्ष असून यंदाची थीम 'नया इंडिया' (Naya India) आहे. या परिसंवादामध्ये एकाच व्यासपीठावर देशभरातील विविध क्षेत्रातील दिग्गजांसोबत संवाद साधला जाणार आहे.


वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 


Javed Akhtar : पाकिस्तानची निर्मिती पूर्णपणे तर्कविसंगत - जावेद अख्तर