मुंबई : लंडनमध्ये भारतीय उच्चायुक्त कार्यालयात टीम इंडियासोबतच्या फोटोमुळे अभिनेत्री अनुष्का शर्माला सोशल मीडियावर टीकेचा सामना करावा लागला. मात्र आपण अशा गोष्टींवर लक्ष देत नाही, या फोटोमुळे कोणताही नियम मोडला गेला नाही, असं स्पष्टीकरण तिने दिलं.

ज्याला स्पष्टीकरण द्यायचंय, त्याने ते दिलेलं आहे. ट्रोल करण्यात आलं. मी ट्रोलिंगवर प्रतिक्रिया देत नाही. त्याच्यावर लक्षही देत नाही, अशी प्रतिक्रिया अनुष्का शर्माने दिली. आगामी सिनेमा 'सुई-धागा'च्या ट्रेलर लाँचिंग कार्यक्रमात अनुष्काला हा प्रश्न विचारण्यात आला.

फोटोमध्ये अनुष्का शर्मा तिचा पती आणि टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीसोबत दिसत आहे. उच्चायुक्त कार्यालयाच्या बाहेरचा हा फोटो आहे. बीसीसीआयने ट्विटरवर हा फोटो शेअर केला होता. त्यानंतर अनुष्कावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली.


ट्रोलिंग करणारांचं म्हणणं होतं, की टीम इंडियाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे विराटच्या शेजारी उभं राहण्याऐवजी मागे उभा आहे. अनुष्काचं तिथे असणं गरजेचं आहे का, असा सवाल काही जणांनी केला होता. दरम्यान, अनुष्काला उच्चायुक्त आणि त्यांच्या पत्नीने निमंत्रण दिलं होतं, शिवाय तिची उपस्थितीही गाईडलाईन्सनुसारच होती, असं वृत्त बीसीसीआयच्या हवाल्याने नंतर समोर आलं होतं.

अनुष्का शर्मा आणि वरुण धवन यांचा सिनेमा ‘सुई-धागा : मेड इन इंडिया’चा ट्रेलर रिलीज करण्यात आला.

पाहा ट्रेलर :