मुंबई: एकीकडे ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यात आनंद शिंदे गीत गाणार असताना दुसरीकडे शिवसेनेचे मुख्य गीत गाणारे गायक अवधूत गुप्ते आणि स्वप्निल बांदोडकर हे शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षाचे गीत गाणार आहेत. त्यामुळे शिवसेनेतील ठाकरे आणि शिंदे गटाचा वाद आता गाण्याच्या माध्यमातूनही दिसून येणार आहे.
शिवसेना पक्षाचे गीत गायलेले दोन्ही गायक शिंदे गटाच्या व्यासपीठावरुन गीत गाताना दिसून येणार आहे. उद्या बिकेसी येथे होणाऱ्या शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला अवधूत गुप्ते, स्वप्निल बांदोडकर, नंदेश उमप हे गायक गीत सादर करणार आहेत. अवधूत गुप्ते आणि स्वप्निल बांडोडकर यांनी या आधी शिवसेनेसाठी गीत गायलं होतं. तसेच या आधीही शिवसेनेच्या अनेक कार्यक्रमांमध्ये अवधूत गुप्ते यांनी शिवसेनेचे गीत गायले होते. मात्र तेच अवधूत गुप्ते आता शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात गीत गाणार आहेत.
आनंद शिंदे ठाकरे गटासाठी गाणं गाणार
शिवतीर्थावर होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी आनंद शिंदे यांनी गाणं तयार केलं असून ते दसरा मेळाव्याच्या व्यासपीठावर हे गाणं सादर करणार आहेत. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीमध्ये गेलेल्या आनंद शिंदे यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. आनंद शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीचे फोटो व्हायरल झाल्यानंतर आनंद शिंदेच्या पक्ष बदलाच्या चर्चा समोर आल्या होत्या. आनंद शिंदे यांनी शरद पवार यांच्या परवानगीनंतरच ठाकरे गटासाठी गाणं तयार केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने अप्रत्यक्षरित्या ठाकरे गटाच्या मेळाव्यासाठी मदत केली आहे.
उद्याचा दसरा मेळावा ऐतिहासिक
शिवसेनेत पडलेल्या ऐतिहासिक फुटीनंतर उद्या होणारा दसरा मेळावा हा दोन्ही गटांसाठी महत्त्वाचा आहे. दोन्ही गटांच्या भवितव्यासाठी हा दसरा मेळावा टर्निंग पॉईंट ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे ठाकरे आणि शिंदे गटाकडून या दसरा मेळाव्याची जोरदार तयारी करण्यात येत आहे.
शिवसेना पक्षप्रमुख या आधीच उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या गटप्रमुखांचा मेळावा घेऊन वातावरण निर्मिती केली आहे. त्यामुळे दसरा मेळाव्याला ते नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचंच लक्ष आहे. शिंदे गटाकडूनही दसरा मेळाव्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते आणण्यात येणार असून लाखोंची गर्दी जमवण्याची तयारी सुरू आहे. शिंदे गटाचे आमदार आणि स्थानिक नेत्यांची त्याची जोरदार तयारी सुरू केल्याचं दिसून येतंय.