Jitendra Awhad on Hum do Hamare Baarah  : 'हम दो हमारे बारह' (Hum do Hamare Baarah)  हा सिनेमा येत्या 7 जून रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. पण त्याआधीच या सिनेमाच्या प्रदर्शनाला तीव्र विरोध होत असल्याचं पाहायला मिळतंय. दरम्यान या सिनेमावरुन सध्या राजकीय वातावरण देखील चांगलच तापलं असल्याचं चित्र आहे. या सिनेमाचा नुकत्याच पार पडलेल्या 77 व्या कान्स फिल्म फेस्टिवलमध्येही प्रिमियर करण्यात आला होता. पण सध्या या सिनेमावर महाराष्ट्रात विरोधाचं वातावरण आहे. ज्येष्ठ अभिनेते अन्नू कपूर (Annu Kapoor) मुख्य भूमिकेत असलेल्या या सिनेमात तगडी स्टारकास्ट आहे. पार्थ समथान, अश्विनी काळसेकर आणि परितोष तिवारी ही मंडळी देखील या सिनेमात आहेत. पण या सिनेमावरुन वाद निर्माण झाला असून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 


कमल चंद्रा यांनी दिग्दर्शित केलेला हा सिनेमा सध्या वादाच्या भोवऱ्यात आहे. इतकचं नव्हे तर या सिनेमाच्या टीझरनंतर सिनेमातील कलाकारांना आणि क्रूला धमक्या येत असल्याचंही कलाकारांनी म्हटलं आहे. याविरोधात कलाकारांनी तक्रार देखील नोंदवली असून त्यामध्ये म्हटलं की, या सिनेमाचा टीझर पाहून सिनेमातील कलाकारांना आणि दिग्दर्शकांना जीवे मारण्याच्या धमक्या येत आहे. त्याचप्रमाणे अन्नू कपूर यांनी यासंदर्भात महाराष्ट्र पोलीस आणि गृह मंत्रालयाकडे सुरक्षा मागितली आहे. तसेच यावर शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. 






जितेंद्र आव्हाड यांनी काय म्हटलं?


माध्यमांशी संवाद साधताना जितेंद्र आव्हाड यांनी या सिनेमावर भाष्य केलं आहे. तसेच त्यांनी हा सिनेमा बनवणाऱ्यांना एक आव्हान देखील दिलं आहे.'त्यांनी मला एक कुटुंब असं दाखवावं की ज्यामध्ये 10 मुलं आहेत, मी त्यांना 11 लाख रुपये द्यायला तयार आहे', असं आव्हाडांनी म्हटलं. त्यावर त्यांनी म्हटलं की, 'आपल्याकडे एक नवीन पद्धत सुरु झालीये, चित्रपटाच्या माध्यमातून चुकीचं आणायचं आणि त्याचा गवगवा करायचा. आधीच्या चित्रपटात सामाजिक भावना, एकता, प्रेम दाखवलं जायचं. केरला चित्रपट तीन दिवसात काढावा लागला कारण लोकांमध्ये जागृती आलीये. महिलांविषयी गैसमज पसरवले गेलेत, किती मुलं असावी याबाबत चुकीचं दाखवलं गेलंय.समाजात वितुष्ट यावं हे भारताच्या हिताचं नाही, फक्त राजकारणासाठी जातीय द्वेष पसरवला जात आहे.'  


पुढे त्यांनी म्हटलं की, 'एका मुसलमानाच्या घरात दहा पोर असल्याचं दाखवा, कोणत्या धर्माच्या पुस्तकात लिहिलं गेलं आहे की संतान किती असावं. सेन्सर बोर्डाने लक्ष घालन गरजेचं. चित्रपट समाजाला एकत्र आणण्यासाठी काढला जावा. दावते इस्लामी नावाच्या बॅनरचा वापर केला गेलाय त्यांची परवानगी न घेता तो चित्रपटात दाखवण्यात आला असल्याचा आरोपही जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.'  


अन्नू मलिक यांनी काय म्हटलं?


अन्नू कपूर यांनी तक्रार दाखल करताना म्हटलं की, आम्हाला सोशल मीडियावर, फोनवरून धमक्या दिल्या जात आहेत. पण मी माझ्या चित्रपटाच्या टीमला सांगेन की घाबरण्याची  गरज नाही. मी सर्वसामान्यांनाही आवाहन करतो की, चित्रपट न पाहता त्यावर कोणतेही मत बनवू नका. आमचा चित्रपट महिला सक्षमीकरणावर भाष्य करणारा आहे. त्यामध्ये लोकसंख्या नियंत्रणाबाबत काही गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत. आमचा उद्देश कोणत्याही धर्माचा अपमान करणे किंवा त्यावर शंका घेणे नाही.


ही बातमी वाचा : 


Marathi Movie :  'शिवाजी अंडरग्राऊंट इन भीमनगर मोहल्ला' फेम अभिनेत्याचा नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला, ‘गाभ’ मधून नवी जोडी रुपेरी पडद्यावर