मुंबई : पाकिस्तानचे महान उर्दू शायर यांच्या 'हम देखेंगे' या गीताला 'हिंदू विरोधी' म्हटल्याने भारतीय शायर आणि गीतकार गुलजार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. "फैजसाहेबांवर आरोप लावणं चुकीचं आहे. ते आशियातील सर्वात मोठ्या शायरांपैकी एक आहेत. ते टाइम्स ऑफ पाकिस्तानचे संपादकही होते. कम्युनिस्ट पक्षाचे नेते होते. त्या स्तराचे शायर जे पुरोगामी चळवळीचे संस्थापकही होते, त्या व्यक्तीला धर्माच्या आधारावर अशाप्रकारे दूषणे देणं योग्य नाही," असं गुलजार म्हणाले. आगामी 'छपाक' सिनेमातील गाण्याच्या लॉन्चनंतर गुलजार यांनी या मुद्द्यावर भाष्य केलं.


नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात आंदोलन करताना 17 डिसेंबर रोजी आयआयटी कानपूरमध्ये विद्यार्थ्यांनी फैज अहमद फैज यांचं 'हम देखेंगे' हे गीत गायलं होतं. परंतु या गीतामधील काही भाग हिंदू विरोधी असल्याचा आरोप आयआयटीच्या फॅकल्टीच्या सदस्यांनी केला होता. हे गीत 'हिंदू विरोधी' आहे का याच्या तपासासाठी कॉलेज प्रशासनाने समितीची स्थापना केली आहे. दिल्लीच्या जामिया विद्यापीठात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात झालेल्या आंदोलनादरम्यान, विद्यार्थ्यांवर केलेल्या लाठीमाराचा विरोध आयआयटी कानपूरमधील विद्यार्थी करत होते.

याविषयी बोलताना गुलजार म्हणाले की, "फैज अहमद फैज यांना सगळेच ओळखतात. त्यांनी पाकिस्तानचा हुकूमशाह जिया-उल-हकच्या राजवटीत हे गीत रचलं होतं. जर आपण ते संदर्भाशिवाय मांडलं तर त्याचं महत्त्वच राहणार नाही. ही त्यांची चूक आहे, जे अशाप्रकारची वक्तव्ये करत आहेत. एक कविता, एक शेर किंवा काहीही लिहिलेलं आहे, त्याला एका चांगल्या दृष्टीकोनातून पाहणं गरजेचं आहे. फैज अहमद फैज यांच्या 'हम देखेंगे' या गीताकडेही असंच पाहायला हवं.

कोण होते फैज अहमद फैज?
फैज अहमद फैज हे पाकिस्तानमधील उर्दू शायर होते. शिवाय ते कम्युनिस्ट होते. त्यांनी 'हम देखेंगे' हे गीत 1979 मध्ये हुकूमशाह जिया-उल-हक याच्या लष्करी राजवटीविरोधात लिहिली होती. फैज अहमद फैज क्रांतीकारी विचारांसाठी ओळखले जात होते. यामुळेच त्यांना अनेक वर्ष तुरुंगवासही भोगावा लागला होता.

त्यांच्या निधनानंतर प्रसिद्ध गझल गायिका इकबाल बानो यांनी हे गीत गाऊन अमर केलं. पाकिस्तानचा तत्कालीन हुकूमशाह जिया-उल-हकने इस्लामविरोधी असल्याचं सांगत साडीवर बंदी घातली होती. याचा विरोध म्हणून 1986 मध्ये इकबाल बानो यांनी काळ्या रंगाची साडी परिधान करुन  सुमारे 50 हजार लोकांसमोर ही कविता गायली होती. 'सब ताज उछाले जाएंगे, सब तख़्त गिराए जाएंगे' या पंक्ती येताच, गर्दीतून 'इन्कलाब जिंदाबाद'च्या जोरदार घोषणा झाल्या. तेव्हापासून हे गीत सरकारचा विरोध करणाऱ्यांचा आवाज बनलं. त्यानंतर ही कविता संपूर्ण जगात प्रसिद्ध झाली.

वाद कोणत्या ओळीवरुन?
'हम देखेंगे' गीतामधील 'बस नाम रहेगा अल्लाह का' या ओळीवरुन वाद आहे. आयआयटीचे उपसंचालक मनिंद्र अग्रवाल यांनी याबाबत विद्यापीठाकडे तक्रार केली होती.

फैज अहमद फैज यांचं गीत

हम देखेंगे...
लाजिम है कि हम भी देखेंगे
वो दिन कि जिस का वादा है
जो लौह-ए-अज़ल में लिख्खा है

जब जुल्म-ओ-सितम के कोह-ए-गिरां
रूई की तरह उड़ जाएंगे
हम महकूमों के पांव-तले
जब धरती धड़-धड़ धड़केगी

और अहल-ए-हकम के सर-ऊपर
जब बिजली कड़-कड़ कड़केगी
जब अर्ज-ए-खुदा के काबे से
सब बुत उठवाए जाएंगे
हम अहल-ए-सफा मरदूद-ए-हरम
मसनद पे बिठाए जाएंगे
सब ताज उछाले जाएंगे
सब तख़्त गिराए जाएंगे
बस नाम रहेगा अल्लाह का
जो ग़ाएब भी है हाज़िर भी
जो मंज़र भी है नाज़िर भी
उट्ठेगा अनल-हक़ का नारा
जो मैं भी हूं और तुम भी हो
और राज करेगी ख़ल्क़-ए-ख़ुदा
जो मैं भी हूं और तुम भी हो