मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून रामायणावर बेतणारे अनेक चित्रपट येऊ घातले आहेत. यात सध्या चर्चा आहे ती आदिपुरुष, सीता अशा चित्रपटांची. पण त्यात आता आणखी एका सिनेमाची भर पडते आहे त्या चित्रपटाचं नाव अद्याप ठरलेलं नाही. पण त्यात असणारे कलाकार आणि ते वठवत असलेली भूमिका पाहता हा प्रोजेक्ट मोठा असल्याची जाणीव होते. 


निर्माते मधु मंटेना आणि त्यांचे सहकारी या महत्त्वाकांक्षी चित्रपटाची निर्मिती करत आहेत. खरंतर आपण अशा पद्धतीचा चित्रपट बनवत आहोत हे त्यांनी 2017 मध्येच सांगितलं होतं. त्यावेळेपासून ही सगळी टीम या सिनेमावर काम करते आहे. हा प्रोजेक्ट लार्जर दॅन लाईफ करण्यासाठी प्रचंड कष्ट घेतले जात आहेत. सगळ्यात महत्त्वाची बाब अशी की जगभरातले विविध आर्टिस्ट.. तंत्रज्ञ यासाठी काम करत आहेत. यांची संख्या ऐकूनच यावर चाललेल्या कामाची प्रचिती येते. सध्या जवळपास 200 लोकांची टीम यावर काम करते आहे. काही ऑस्कर नामांकन मिळालेले तंत्रज्ञही यात आहेत. आता हा प्रोजेक्ट शूट करता तयार होऊ लागला असतानाच त्यातल्या कलाकारांची चर्चा होऊ लागली आहे. हा प्रोजेक्ट इतका मोठा आहे तर यातले कलाकार कोण असणार याकडे अनेकांचं लक्ष होतं. यात साहजिकच प्रभू श्रीरामाची भूमिका, सीतेची भूमिका आणि रावणाची भूमिका कोण साकारणार याकडेच प्रत्येकाचं लक्ष असतं. आता सध्या बॉलिवूडमध्ये चालू असलेल्या चर्चेनुसार यात तीन नावं आली आहेत. 


मधु मंटेना यांच्या या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत दंगल फेम नितेश तिवारी. त्यांच्यासोबत सह दिग्दर्शनासाठी मॉम या चित्रपटाचे दिग्दर्शक रवी उद्यावर हेही सोबत असणार आहेत. सध्या सिनेमाच्या पटकथेवर खूपच बारीक काम चालू असून त्यातल्या भूमिकांसाठी तीन मोठी नावं समोर आली आहेत. यात प्रभू श्रीरामाच्या भूमिकेसाठी दक्षिणेतला सुपरस्टार महेश बाबू याचं नाव समोर आलं आहे. तर लंकाधिपती रावणाच्या भूमिकेसाठी हृतिक रोशन याच्याशी बोलणं चालू आहे. सीतेची भूमिका साकारण्याची शक्यता आहे दीपिका पडुकोण. या तीनही नावांवर अद्याप शिक्कामोर्तब झालं नाही. पण या नावांच्या चर्चेला निर्मात्यांनी खोडूनही काढलेलं नाही. या तीन नावांवरुन हा प्रोजेक्ट किती महत्त्वाचा असेल हे सर्वांच्या लक्षात आलं असेल. आजवर भारतातला सर्वात महागडा चित्रपट हा असेल असा दावा बॉलिवूड ट्रेडर्स करत आहेत. 


एकीकडे या तीन नावांची चर्चा असली तरी या तिघांना आदिपुरुषशी टक्कर द्यावी लागणार आहे. शिवाय सीता हा चित्रपट आहेच. हे दोन सिनेमे आणि त्यापेक्षा काहीतरी भव्य.. करण्याच्या हालचालींना आता वेग आला आहे. येत्या काळात रामायण युग पुन्हा एकदा अवतरणार यात शंका नाही. फक्त पूर्वी ते छोट्या पडद्यावर अवतरलं होतं. आता हा महिमा मोठ्या पडद्यावर अवतरणार आहे.