Highest Grossing Sequel Movies : बॉक्स ऑफिसवर चित्रपटांची घोडदौड सुरुच असते. काही चित्रपट फ्लॉप ठरतात, तर काही चित्रपट हिट होतात. अलिकडच्या काळात चित्रपटांच्या सीक्वेलचा जणू ट्रेंडच बनला आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. हिट चित्रपटांच्या सीक्वेलकडून चाहत्यांना मोठी अपेक्षा असते, त्यासाठी लोक उत्सुक असतात. काही चित्रपटांच्या सीक्वेलमुळे चाहत्यांची सपशेल निराशा झाल्याचं पाहायला मिळतं, तर हिट काही चित्रपटांचे सीक्वेल सुपरहिट ठरतात. अशाच काही चित्रपटांबद्दल जाणून घ्या, ज्या चित्रपटांच्या दुसऱ्या भागाने पहिल्या भागापेक्षा जास्त कमाई केली आणि अनेक रेकॉर्ड मोडले. अलिकडेच आलेल्या स्त्री 2 चित्रपटाने स्त्री चित्रपटाच्या कमाईला मागे टाकलं.


स्त्री 2


या वर्षी रिलीज झालेल्या स्त्री 2 ( Stree 2 ) चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर नवीन रेकॉड रचला, ज्याचा कुणी विचारही केला नव्हता. श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव स्टारर स्त्री 2 चित्रपटाने देशात बॉक्स ऑफिसवर 569.5 कोटी रुपये कमवून गदर 2 आणि पठाण चित्रपटाचे रेकॉर्ड मोडले आहेत. 15 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची जादू महिन्याभरानंतरही थिएटरमध्ये कायम आहे. चित्रपटाची अजूनही बॉक्स ऑफिसवर कमाई सुरूच आहे. स्त्री 2 हा सर्वाधिक कमाई करणारा हॉरर कॉमेडी चित्रपट ठरला आहे. अमर कौशिक यांनी दिग्दर्शित केलेला स्त्री 2 चित्रपट दिनेश विजन यांच्या हॉरर कॉमेडी विश्वाचा एक भाग आहे.


बाहुबली 2


बाहुबली चित्रपटाचा सिक्वेल बाहुबली 2 चित्रपटगृहात दाखल होताच मोठा धमाका झाला होता. कटप्पाने बाहुबलीला का मारलं, यामागचं कारण जाणण्यासाठी प्रेक्षक फारच उत्सुक होते, त्यामुळे बाहुबलीपेक्षा बाहुबली 2 पाहण्यासाठी जास्त प्रेक्षक चित्रपटगृहात पोहोचल्याचं पाहायला मिळालं. बाहुबली 2 चित्रपटाने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 1030.42 कोटी रुपयांची कमाई केली आणि जगभरातही बंपर कलेक्शन केलं. या चित्रपटाने जागतिक स्तरावर 1788.06 कोटींची कमाई केली होती. एसएस राजामौली दिग्दर्शित बाहुबली 2 चित्रपट 2017 मध्ये प्रदर्शित झाला होता. प्रभास, अनुष्का शेट्टी, तमन्ना भाटिया, सत्यराज यांच्यासह अनेक कलाकारांनी यात महत्त्वाच्या भूमिका बजावल्या होत्या.


गदर 2


सनी देओल आणि अमिषा पटेल करिअरमधील मैलाचा दगड ठरलेला हिट चित्रपट गदरच्या सिक्वेलनेही बॉक्स ऑफिस तुफान गाजवलं. 2001 मध्ये आलेल्या गदर चित्रपटानंतर 22 वर्षांनंतर आलेला गदर 2 चित्रपटही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. गदर 2 चित्रपटाने पहिल्याच दिवशी 40 कोटींची कमाई केली होती. या चित्रपटाने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 525.7 कोटी रुपयांची कमाई केली आणि दंगल चित्रपटाला कमाईच्या बाबतीत मागे टाकलं. गदर 2 चित्रपटाचं जगभरातील कलेक्शन 686 कोटी रुपये होते.


केजीएफ 2


केजीएफ चॅप्टर 2 ( KGF : Chapter 2 ) चित्रपटाने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 859.7 कोटी रुपयांची कमाई केली होती. या चित्रपटाने जगभरात 1215 कोटी रुपये कमाई केली. त्यामुळे हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. केजीएफ 2 चित्रपटाचं दिग्दर्शन प्रशांत नील यांनी केले होते. केजीएफ चित्रपटाचा पहिला भाग 2018 मध्ये प्रदर्शित झाला होता, तर केजीएफ 2 चित्रपट 2022 मध्ये प्रदर्शित झाला होता. आता चित्रपटाच्या तिसऱ्या भागावरही काम सुरू आहे. यश, संजय दत्त, श्रीनिधी शेट्टी, रवीना टंडन आणि गरूड राम यांच्यासह अनेक कलाकारांनी या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


OTT Release This Week : या आठवड्यात ओटीटीवर मनोरंजनाची मेजवानी; बहुप्रतिक्षित 4 चित्रपट ओटीटीवर रिलीज, वेब सीरीजमधूनही मनोरंजनाचा डोस