मुंबई : बॉलिवूड इंडस्ट्रीचे नियम वेगळे आहेत. बॉलिवूडमध्ये कोण कुणाला कधी आणि कसं काम देईल हे सांगता येत नाही. कित्येकदा मिळालेलं कामही निघून जाण्याची शक्यता असते. म्हणून अनेकदा मुलाखतींमध्ये कलाकार पाईपलाईनमध्ये असल्याचं सांगतात. कारण, सिनेमात घेण्याबद्दल चर्चा झाली असली तरी जोवर सिनेमाचं चित्रिकरण सुरू होत नाही तोवर काही खरं नसतं. असाच काहीसा अनुभव अभिनेत्री तापसी पन्नूला आला आहे. तापसीनेच आपल्याबाबत घडलेली घटना बोलून दाखवली आहे.


तापसी पन्नू ही मेहनतीने इंडस्ट्रीत स्थिरावली आहे. पिंक, बेबी, नाम शबाना, जुडवा 2 आदी अनेक चित्रपटांमधून तापसी पन्नूने आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. काही महिन्यांपूर्वी आलेल्या थप्पड सिनेमानेही चांगली लोकप्रियता मिळवली. थप्पडसारख्या सिनेमात कणखर भूमिका वठवणारी तापसी आपल्या रोजच्या जगण्यातही तितकीच स्पष्टवक्ती आहे. म्हणूनच रिया चक्रवर्तीला सुशांत मृत्यू प्रकरणात अटक झाल्यानंतर तापसीने आपली भूमिका मांडली होती. त्यावेळी कंगना रनौतसोबत तिचं शीतयुद्धही सुरू होतं. आता हा सगळा प्रकार शांत झाल्यावर तापसीने आपल्याला आलेले अनुभव कथन केले आहेत.


तापसी आता प्रसिद्ध अभिनेत्री बनली असली तरी तिलाही अनेकदा अडचणींना सामोरं जावं लागलं आहे. आपला अनुभव कथन करताना तापसी म्हणाली, 'इंडस्ट्रीत काम करताना अनेक अनुभव येतात. मी एका सिनेमात नायिकेची भूमिका करण्यासाठी निवडले गेले होते. पण त्यानंतर या सिनेमात जो मोठा नायक होता त्याच्या पत्नीला मी सिनेमात असणं रुचलं नाही. त्यामुळे तिच्या मताचा विचार करून मला या सिनेमातून काढून टाकण्यात आलं आणि माझ्याजागी नव्या नायिकेला घेण्यात आलं. म्हणजे सिनेमाला काय महत्वाचं वाटतं त्यापेक्षा हिरोच्या पत्नीला काय वाटतं ते महत्वाचं असतं. असे अनेक अनुभव आहेत. मी एका चित्रपटाच्या डबिंगला गेले होते. त्यानंतर तिथे माझ्या तोंडी असलेला एक संवाद तिथल्या नायकाला आवडला नाही म्हणून माझा हा संवाद काढून टाकण्यात आला. असं खूपदा होत असतं. '


तापसीच्या या वक्तव्यामुळे बॉलिवूडमध्ये ज्या पद्धतीने काम दिलं जातं वा काढून घेतलं जातं ते लोकांसमोर येऊ लागलं आहे. बॉलिवूडच्या याच कामकाजाला कंटाळून अनुभव सिन्हा, सुधीर मिश्रा यांच्यासारख्या दिग्दर्शकांनी आपण बॉलिवूड सोडत असल्याचं सांगितलं होतं. आता तापसीच्या या वक्तव्यांमुळे हा वाद पुन्हा एकदा उफाळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही.